वाजपेयी सर्वांचे आदर्श नेते

  • संतोष भारती

लोकनेते असा नावलौकिक असलेले स्व. श्री. अटलबिहारी वाजपेयी हे माझे राजकारणातील आदर्श आहेत. एका प्राथमिक शिक्षकाच्या घरात श्री. वाजपेयी यांचा जन्म झाला. त्यांचा सामाजिक जीवनातील उदय हा भारतीय लोकशाही व त्यांच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेचा गौरव आहे. १९५१ साली भारतीय जनसंघात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता. वाजपेयी एक ख्यातनाम कवी होते. शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत व पाककलेतही विशेष रस घ्यायचे. १३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांनी सलग दुसर्‍यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. १९९६ साली थोड्या कालावधीसाठी त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले होते. पंडित नेहरूंनंतर सलग दुसर्‍यांदा जनादेश मिळवून पंतप्रधान होणारे ते पहिले पंतप्रधान ठरले होते.

ज्येष्ठ संसदपटू असलेले वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रिय होते. वाजपेयी नऊवेळा लोकसभेवर, तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते, हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली.

महिला सबलीकरण व सामाजिक समानतेचे खंबीर समर्थक असलेले श्री. वाजपेयी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये एक दूरदर्शी, विकसित आणि मजबूत राष्ट्र म्हणून बघू इच्छित होते. भारताप्रती असलेले त्यांचे निःस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षांहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निःस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. १९९४ साली उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. एका उल्लेखानुसार, वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निःस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खर्‍या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. जनसामान्यांच्या आशाआकांक्षा श्री. वाजपेयी यांनी पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते. आज आपण पाहात आहोत हे भाजपचे सर्व नेते त्यांच्याच तालमीत तयार झाले आहेत.

Sumitra nalawade: