रशिया – युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर देशभरात महागाई वाढती आहे. युद्ध तिकडे, परिणाम इकडे जाणवत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे महागाईचा भडका उडाला आहे. स्वयंपाकघरातील सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत.
पिंपरी ः तेल, लाल मिरची, मैदा, आटा, रवा, गहू, मसाला या स्वयंपाकघरातील दररोज लागणार्या खाद्यान्नांच्या किमती प्रचंड वाढल्याने सामान्यांच्या नाकीनऊ आले आहेत. महिन्याचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. मागील १५ दिवसांत झालेल्या भाववाढीने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पुन्हा इंधनाने दर वाढणार असल्याने भाववाढ अटळ असल्याचे सांगण्यात येत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडताच गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढविल्या आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून ९०३.५० रुपयापर्यंत स्थिरावलेला घरगुती गॅस सिलिंडर आता थेट ९५५ रुपयांपर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाकडून यापूर्वी मिळत असलेली सबसिडी बंद करण्याविषयी शासनाने घोषणा केलेली नाही. पण, ती ग्राहकांना मिळतही नाही. त्यामुळे आता ग्राहकांना घरगुती गॅस सिलिंडरसाठी तब्बल ९५५ रुपये मोजावे लागत आहेत. घरगुती गॅस जवळपास ५० रुपयांनी महागल्याने गृहिणी संतापल्या आहेत.
पामतेलाची आयात कमी :
पामतेलाचा वापर कमी किमतीमुळे अधिकाधिक प्रमाणात होतो. मिठाईच्या निर्मितीसाठीदेखील पामतेलाचा वापर अधिक होतो. आता नेमकी पामतेलाची आयात कमी झाली आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त किमतीच्या तेलाचा पर्याय संपला आहे. त्याचा परिणाम इतर खाद्यतेलांच्या पुरवठ्यावर मागणीचा दबाव वाढविणारा ठरला आहे.
शहरात फ्लॅटमध्ये राहणार्या नागरिकांना चूल पेटविता येत नाही. तर, वस्त्यांमध्येही धुरामुळे आपले आणि शेजारच्याचेही घर खराब होण्याच्या भीतीने चूल पेटविता येत नाही. अशा परिस्थितीत सातत्याने वाढणारे गॅस सिलिंडरचे दर चिंताजनक असल्याचे व्यापार्यांचे म्हणणे आहे. रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील १५ दिवसांत खाद्यतेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. प्रत्येक किलोमागे १२ ते २० रुपयांनी महागले आहे. रशिया – युक्रेन यांच्यातील संघर्षामुळे भारतीय गव्हाला भावही परवेडनासे झाल्याने शहरातील वस्त्यांमध्ये पुन्हा चुलीचा धूर दिसू लागला आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले. मात्र, सिलिंडर भरणेच परवडत नाही. आता तर सबसिडीही बंद केली आहे.
उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस घेणार्या ग्राहकांना ९५० रुपयांचा सिलिंडर भरणे कसे परवडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर दिली जाणारी सबसिडी केवळ नावापुरतीच उरली असल्याचे मार्च २०२० पासून दिसून येत आहे. गव्हापासून तयार करण्यात येणारा मैदा, आटा, रवा, सुजीच्या दरात प्रतिकिलो तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरापासून साखरेचे भाव स्थिरावल्याचे चित्र आहे. इंधन दरवाढ झाल्याने अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. येत्या काही दिवसांत अनेकांच्या ताटातील तेलाची फोडणी गायब झाली आहे. खाद्यतेलाचे भाव मागील आठवडाभरात २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दराने वाढले आहेत. त्यासोबत मिठाईचा बाजारदेखील भडकला आहे. हॉटेलिंग व्यवसायातदेखील आता खाद्यपदार्थांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाचे अर्थकारण हे सर्वस्वी आयातींवर अवलंबून आहे. पाम तेल मलेशियातून आयात होते. पाम तेलाचे भाव हे सर्वात कमी असतात.