आता कोरोना आटोक्यात येतोय. मात्र या संपूर्ण संसर्गकाळानं आपल्या आरोग्यविषयक जाणिवा, संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडवला असून या बदलत्या विचारांनिशी आता आरोग्याकडे बघण्याची गरज असल्याचं सर्वप्रथम समजून घ्यावं लागेल. अद्यापही याविषयी सजग नसणार्यांसाठी जागतिक आरोग्य दिनासारखा दुसरा योग्य मुहूर्त नाही. जनसामान्यांनी आपल्या आरोग्याप्रती सत्वर जागरुक होणं आवश्यक आहे.
कोरोनाचा संसर्ग नाहीसा होण्याच्या मार्गावर असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा साजरा होणारा जागतिक आरोग्यदिन अनेकार्थानं महत्त्वाचा आहे, असं म्हणावं लागेल. गेली दोन वर्षं समाजाची कोरोनाशी अटीतटीची लढाई सुरू होती. या अज्ञात शत्रूविरुद्ध सगळा समाज शर्थीची झुंज देत होता. यामध्ये आरोग्यक्षेत्राची भूमिका किती निर्णायक होती, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. या काळात सर्व आरोग्य यंत्रणांनी दिलेलं योगदान अतुलनीय म्हणावं लागेल.
आता कोरोना आटोक्यात येतोय. मात्र या संपूर्ण संसर्गकाळाने आपल्या आरोग्यविषयक जाणीवा, संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडवला असून आता या बदलत्या विचारांनिशी आरोग्याकडे बघण्याची गरज असल्याचं सर्वप्रथम आपण समजून घ्यावं लागेल. अद्यापही याविषयी सजग नसणार्यांसाठी जागतिक आरोग्यदिनासारखा दुसरा योग्य मुहूर्त नाही, असं मी म्हणेन. खरं सांगायचं तर समस्त जगावर कोरोनासारखं आरोग्यसंकट कोसळेल आणि लोकांचं घराबाहेर पडणंही बंद होईल, लाखोंचे बळी जातील, अशी आपण कधी कल्पनाही केली नव्हती. पण हे घडलं. या पार्श्वभूमीवर ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर’ या तत्त्वानुसार आता तरी आपण नियमित आरोग्य तपासण्या करून घेणं अत्यावश्यक आहे. मध्यंतरीच्या काळात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पूर्णपणे बाजूला पडली होती. मात्र कोरोनाकाळात या व्यवस्थेची गरज नव्याने जाणवली. एखादा मुलगा वडिलांची तब्येत दाखवायला डॉक्टरांकडे जायचा आणि माझंही बीपी बघा, असं सांगायचा तेव्हा तेही आस्थेनं त्याचा रक्तदाब तपासायचे, त्याला आश्वस्त करायचे. असा अनुभव आल्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा फॅमिली डॉक्टरचं महत्त्व समजलं. त्यामुळेच आता हे नातं आणि ही संकल्पना जपण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे.
आधी आपण आरोग्याविषयी बर्यापैकी ढिसाळपणा दाखवला. काही होत नाही तोपर्यंत तपासण्या करायच्या नाहीत, ही आपली सवय होती. पण यापुढे ही बाब परवडणारी नाही. आता प्रत्येकाने नियमित तपासण्यांकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे. या तपासण्यांमध्ये एखादी छोटी चुकीची बाब लक्षात आली तर त्याकडे तातडीने लक्ष देऊन विषय मार्गी लावणं गरजेचं आहे. आज घरोघरी मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीविकार आदींचे रुग्ण आढळतात. मात्र या रुग्णांची मुलं स्वत:च्या आरोग्याबाबत निष्काळजी असतात. स्वत:ला मधुमेह जडत नाही तोपर्यंत ते काळजी घेत नाहीत. एकीकडे त्यांचं वजन वाढत असतं, पाय दुखत असतात, थकवा जाणवत असतो, पण तरीही ते तपासणी करून घेत नाहीत. आता यापुढे तरी ही बेफिकिरी दूर होणं गरजेचं आहे. कोरोनाकाळात वर उल्लेख केलेले आजार असणार्यांना संसर्गाचा अधिक धोका असल्याचं आपण पाहिलं. म्हणून या आजारांवर औषधं घेतोय म्हणजे मी सुरक्षित आहे, असं समजण्याचंही कारण नाही. आपली रक्तशर्करा नियंत्रणात आहे, असा विचार करून निर्धास्त राहताना हे सगळे सदोष जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार आहेत, हेही आपण समजून घ्यायला हवं. तेव्हाच आपण सदोष जीवनशैली सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त होऊ.
आपली शुगर १४० असेल तर मधुमेही खूश होतो. पण त्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, की चार गोळ्या खातोय तेव्हा शुगर नियंत्रणात राहत आहे. थोडक्यात, आपलं आरोग्य उत्तम नाही तर घेतो त्या गोळ्या उत्तम आहेत. हा विचार केला तरच आपण आरोग्यसंपन्नतेकडे पावलं टाकू शकतो. मुळात आनुवंशिक आजार होऊच नयेत, यासाठी आधीपासून काळजी घेतली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे इतर सर्व गरजांसाठी आर्थिक तरतूद करताना आरोग्यासाठीही पुरेशी तजवीज करून ठेवणं गरजेचं आहे. कोरोनाने ही आवश्यकता आपल्यासमोर आणली आहे. ही सगळी चर्चा करताना आयुर्वेदाचं नव्यानं पटलेलं आणि समोर आलेलं महत्त्व नाकारून चालणार नाही. व्याधीमुक्त राहण्यासाठी आयुर्वेदानं अनेक सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. आजार होऊच नये, म्हणून आयुर्वेद पंचकर्म करण्यास सांगतं.
आहारशास्त्रानं योग्य दिनचर्या सांगितली आहे. रोज सकाळी उठल्यानंतर गुळण्या करा, नाकात औषध घाला, झोपताना नाकात तूप घाला हे सगळं परंपरेनं आपल्याला सांगितलं आहे. हात-पाय धुतल्याशिवाय घरात फिरायचं नाही, चप्पल घराबाहेर काढायच्या, तुपाला खरकटा हात लावायचा नाही, शिळं अन्न खायचं नाही, हे सगळे नियम कोरोनाकाळात आपण पाळले. कोरोनात अनेकांसाठी उपयुक्त ठरलेला काढाही आयुर्वेदिक वनौषधींपासून बनवलेला होता. मुख्य म्हणजे प्रत्येकानं आपली प्रकृती जाणून घेतली पाहिजे. आपली प्रकृती वात, पित्त की कफकारक आहे, हे जाणून योग्य तो आहार घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे आपला स्वभावही जाणून घेतला पाहिजे. स्वभाव रागीट आहे, ताण घेणारा आहे की काळजी करणारा आहे, हे समजलं की विचारांचं व्यवस्थापन करणं सोपं जातं.
ऋतूबदलानुसारही काही व्याधी डोकं वर काढतात. आपल्याकडे महिनाभरापूर्वी चांगलीच थंडी होती. तेव्हा आपण वेगळे कपडे घालून बाहेर पडायचो. पण तेच कपडे घालून आज आपण बाहेर पडत नाही. मात्र त्यावेळी घरात जो स्वयंपाक होत होता तोच आजही होतो. हिवाळ्यात कडकडून भूक लागते म्हणून आपण चार पोळ्या खातो. पण त्याच न्यायानं आताही तोच आहार घेतला तर ती मोठी चूक ठरेल. थोडक्यात सांगायचं तर, आपण चयापचय क्रियेवर लक्ष ठेवायला हवं. किती वाचलं यापेक्षा किती लक्षात राहिलं, हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे किती खाल्लं यापेक्षा किती पचलं, हे शरीरस्वास्थ्यासाठी महत्त्वाचं असतं, हे आपण जाणून घ्यायला हवं.
कोरोना संसर्गाने कोणाला फुफ्फुसाचा त्रास झाला, कोणाचा मेंदू क्षतीग्रस्त झाला, कोणाला हृदयविकाराचा त्रास झाला, कोणाला स्नायूंचा त्रास बळावला… अशा सर्वांनी त्या त्या अवयवाला बळकटी देणारा आहार आणि व्यायाम घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ डाळिंब हृदयासाठी उत्तम आहे, हळद प्रतिकारक्षमतेसाठी उत्तम आहे, अक्रोड मेंदूसाठी उत्तम आहे. अशा प्रकारे आहारात या घटकांचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. यामुळे या अवयवांचा कमकुवतपणा कमी होण्यास मदत होईल. डॉक्टरांचा कोरोनाबाधितांशी थेट आणि सततचा संपर्क होता. त्यांच्यावर कामाचं प्रचंड दडपण होतं. या साथीत बर्याच डॉक्टरांनी प्राण गमावले. पण देशातल्या डॉक्टरांची एकूण संख्या बघितली तर मृत्युमुखी पडणार्यांचं प्रमाण बरंच कमी आढळेल. त्यामुळेच याविषयीही संशोधन होणं गरजेचं आहे. यातूनही अनेक महत्त्वपूर्ण निष्कर्ष पुढे येतील, जे आपल्या आरोग्यविषयक माहितीमध्ये मोलाची भर घालू शकतील.
_डॉ. सुयोग दांडेकर (लेखक हे सुप्रसिद्ध वैद्य आहेत.)