‘शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर…’- यशोमती ठाकूर

अमरावती : सध्या महाविकास आघाडीमधील पक्षप्रमुख असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर खटके उडत असल्याचं चित्र दिसत आहे. यादरम्यान राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंचावर असताना यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

रविवारी शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमादरम्यान मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं आहे.

“शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्यानंतर काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर पुन्हा बोलताना, “टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. पावरांसाठी जोरात टाळ्या वाजवा,” असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या, “चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली तेव्हा पवार मला म्हणाले होते मी ऐकलं तुझं टीव्हीवर. मला कोणी काही सांगितलं नव्हतं. पण पवार या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार असं या ठिकाणी मी सांगते.”

Sumitra nalawade: