पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत आंदोलन केल्याची घटना घडली. या घटनेनंतर राजकीय चर्चांणा उधान आलं असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला निंदनीय असून या हल्ल्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं ते म्हणाले आहेत. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, राज्य सरकारने एसटी कामगारांच्या भावनेचा विचार करायला हवा. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, मागील कित्येक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मात्र एसटी कामगारांच्या भावनांचा विचार न केल्याने त्यांचा उद्रेक झाला असून त्यातून हा हल्ला झाला आहे. पण अशा प्रकारचा हल्ला करणे योग्य नसून ही घटना निंदनीय आहे. शरद पवार यांच्या घरी हल्ल्याबाबत पोलिसांना माहिती नव्हती का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे सरकारच या हल्ल्यास जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, हल्लेखोर एसटी कामगारांना कामावर घेणार नाही, अशी भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी मांडली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्यांना कामगारांना कामावर न घेण्याची भूमिका देखील चुकीची आहे.