मुंबई : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी मुंबईतील शितिर्थवर जाऊन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले आपण या भेटीनंतर शंभर टक्के समाधानी आहे. तसंच राज ठाकरे यांची ‘शिवतिर्थ’ येथे भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सर्व बोलणं झालं असून उद्या म्हणजेच १२ एप्रिल रोजी होणाऱ्या ठाण्यातील सभेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील असं राज ठाकरेंनी सांगितल्याची माहिती दिली आहे.
वसंत मोरे म्हणाले, “सगळं बोलणं झालं आहे. उद्या ठाण्याच्या सभेला ये तुला सगळी उत्तर मिळतील असं सांगितलं आहे.” तसेच पत्रकारांनी तुम्ही या भेटीनंतर समाधानी आहात का?, असा प्रश्न विचारला असता, मोरेंनी, “मी १०० टक्के समाधानी आहे,” असं सांगितलं आहे.
“मी समाधानी होऊनच इथून चाललोय. मागील दोन तीन दिवसांपासून ज्या काही चर्चा होत्या त्यादरम्यानही मी सांगत होतो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे आणि मनसेमध्येच राहील,” असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे. “ज्या अडचणी होत्या त्या दूर झाल्यात का?”, असा प्रश्न मोरेंना विचारण्यात आला. त्यावर, “उद्याची उत्तर सभा आहे उद्याच्या सभेत राज ठाकरे सर्व प्रश्नांची उत्तरं देतील, “बाकी जे बोलायचं आहे ते राज ठाकरे पुण्यात येऊन बोलणार आहेत,” असंही मोरे यांनी सांगितलं आहे.