“शिशिर काका बस करा हे धंदे, घरी बसून…”, अमेय खोपकरांकडून खोचक सल्ला, म्हणाले…

मुंबई : (Amay Khopkar On Shishir Shinde) ठाकरे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. माजी आमदार शिशिर शिंदे यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. मातोश्रीवर जाऊन त्यांनी सुपूर्द केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर मुंबईत पार पडण्याच्या एक दिवस आधीच शिशिर शिंदे यांनी पक्ष सोडला आहे. उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी शिशीर शिंदे यांना शाब्दिक चपराक लगावली आहे.

दरम्यान, यावरून अमेय खोपकर यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. “शिशीर काका, बस करा हे आता हे धंदे …खरंतर निवृत्तीचे वय झालंय. इकडून तिकडे बेडूक उड्या मारणे शेाभत नाही. मागे वळून बघण्याचा विचार सुद्धा करू नका. सतत बाळासाहेब, बाळासाहेब करून ना कधी सहानुभूती मिळाली आणि ना कधी मिळणार. आता घरी बसून आराम करा. फुकटचा पण प्रामाणिक सल्ला आहे, घ्यायचा तर घ्या नाहीतर सोडून द्या”, अशा शब्दांत अमेय खोपकर यांनी शाब्दिक चपराक लगावली आहे.

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे यांना ओळखले जायचे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदेंचा समावेश होता. ते मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१८ मध्ये त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. मात्र आता त्यांनी आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत उद्धव ठाकरेंचीही साथ सोडली आहे.

Prakash Harale: