साडेसात हजार पदे रिक्त

सर्वच श्रेणीतील कामगारांची होणार भरती

पुणे महापालिकेची तब्बल साडेसात हजार पदे रिक्त आहेत. महापालिकेमध्ये वर्ग १ ते वर्ग ४ पर्यंतच्या रिक्त पदाची गेल्या अनेक वर्षांपासून भरती झालेली नाही. त्यामुळे सेवा नियमावली मान्य होऊनही तब्बल ७ हजार ७०३ जागा रिक्त झाल्याची माहिती समोर झाली आहे. कंत्राटी कामगार आणि सरकारच्या अधिकार्‍यांवर महापालिकेचा कारभार सुरू आहे.

पुणे ः राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महापालिका पुणे आहे. नुकतेच महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश झाला आहे. एवढ्या मोठ्या महापालिकेचा डोलारा चालवायचा असल्यास पुणे कर्मचारी वर्ग आवश्यक आहे. महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगारांची भरती गेल्या वर्षांपासून झालेली नाही. कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून झाडण काम केले जाते. त्यामुळे कायमस्वरूपी पदे भरण्याकडे कायमच दुर्लक्ष करण्यात येत आहे. पुण्याची लोकसंख्या ५० लाखांपर्यंत पोहोचत आहे. असे असताना स्मार्ट सिटी असलेल्या पुण्यात महापालिकेच्या सेवा योग्य पद्धतीने मिळणे आवश्यक आहे.

पुणे महापालिकेची कंत्राटी पद्धतीला पसंती :
महापालिका प्रशासनाने आता बांधकाम विभाग व अग्निशमन विभागात भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील ५०० पदे येणार आहेत. मात्र, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे मात्र भरण्यात येत नाहीत. शेकडो कोटी रुपये महापालिका झाडण कामांच्या निविदांवर खर्च करीत आहे. ठेकेदारांकडून कामगार पुरविले जातात. पण या कामगारांना व्यवस्थित पगार दिला जात नाही. त्यामुळे अशा कामगारांचे शोषण होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. अनेक कामे ठेकेदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका पदभरतीला टाळाटाळ करीत आहे. दरम्यान, संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याचे काम कामगार करतात. त्यांना वेळेवर पगार न देणे, हे आर्थिक शोषण करण्यासारखे आहे.

यासाठी महापालिका प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. मागील अनेक वर्षांपासून अपुर्‍या कर्मचार्‍यांवर महापालिकेचा गाडा सुरू आहे. सेवा नियमावलीनुसार महापालिकेत वर्ग १ ची १४६ पदे मंजूर आहेत. यापैकी ४० पदे भरण्यात आली आहेत. १०६ पदे रिक्त आहेत. वर्ग २ ची ३७३ पदे मंजूर असून, १७३ पदे भरण्यात आली आहेत. यामधील २०० पदे रिक्त आहेत. वगर्र् तीनची ४ हजार ८२४ पदे मंजूर आहेत. यापैकी २ हजार ८१० पदे भरण्यात आली आहेत. २ हजार १४ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची ६ हजार २१ पदे मंजूर आहेत. यापैकी ३ हजार ५६२ पदे भरण्यात आलेली आहेत. २ हजार ४५९ पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिका ५० टक्के कर्मचार्‍यांवरच सुरू आहे.

Dnyaneshwar: