कोल्हापूर : शिवसेनेची स्थापन झाल्यापासून शिवसेनेने कधीही झेंडा, रंग, विचार, नेता बदलला नाही. भाजप मात्र लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी यांना विसरले. कुठेही एखाद्या पोस्टरवर त्यांचा फोटो दिसत नाही. फक्त नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसतो. लोकसभेची निवडणूक असो किंवा गावच्या सरपंचपदाची प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदींचाच चेहरा दिसतो. मोदी हे पंतप्रधान आहे की गावचे सरपंच, हेच जनतेला समजत नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर लगावला.
भाजप नेहमी भगव्याचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरल्याचे त्यांचे नेते सांगत असतात. मात्र, कोणता भगवा. खरा भगवा तर शिवसेनेचा आहे. अजून कोणताच नाही. तुमचा भगवा खरा भगवा नाही. भाजपकडून देशात दुसरा हिंदुहृदयसम्राट
निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदुसम्राट म्हटलं की फक्त बाळासाहेब ठाकरे आठवतात. तेव्हा भाजपचा नकली बुरखा व भगवा फाडायला हवा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज हे बाळासाहेब ठाकरे यांनाही विसरले आहे. म्हणूनच त्यांनी समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले नाही. भाजपने ऐवढाही मोठेपणा दाखवला नाही. आता महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.