हिंदूंसह अन्य अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करा; भारताने बांगलादेशला ठणकावले

Indian Foreign Secretary Vikram Misri

शेजारच्या बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री पहिल्यांदाच चर्चेसाठी ढाक्यात दाखल झाले. ढाक्यात पोहोचताच त्यांनी बांगलादेशला स्पष्टपणे सांगितले की, सर्वप्रथम हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांचे संरक्षण आणि त्यांच्या धार्मिक स्थळांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. हा मुद्दा त्यांनी आपल्या समकक्षांसमोर जोरदारपणे मांडला. परराष्ट्र सचिव मिस्री यांनी बांगलादेशच्या परराष्ट्र सल्लागारांना सांगितले की, भारताला सकारात्मक, रचनात्मक आणि समान हित हवे आहे, त्यामुळे बांगलादेशनेही असेच वागले पाहिजे.

उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मिस्री म्हणाले की, बांगलादेशच्या अंतरिम सरकारसोबत जवळून काम करण्याची भारताची इच्छा मी आज अधोरेखित केली आहे. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जशीमुद्दीन यांच्यासोबत ढाका येथे सोमवारी बैठक घेतली. ऑगस्टमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार हटवल्यानंतर भारताचा हा पहिलाच उच्चस्तरीय दौरा आहे. हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे नवी दिल्ली आणि ढाका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत असताना मिस्री यांचा हा दौरा आहे.

भारतीय हवाई दलाच्या विमानाने मिस्री ढाका येथे दाखल झाले. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने विमानतळावर त्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा देखील विमानतळावर उपस्थित होते. येताच मिसरी यांनी जशीमुद्दीन यांची भेट घेतली.

बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमचे परराष्ट्र सचिव जशीमुद्दीन आणि त्यांचे समकक्ष विक्रम मिस्री यांच्यात राज्य अतिथीगृहात नियोजित वेळापत्रकानुसार बैठक सुरू आहे. आधी त्यांच्यात थोडक्यात चर्चा झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींसोबत औपचारिक बैठक सुरू झाली. या अधिकाऱ्याने सांगितले की, बांगलादेशी पक्ष सोमवारी या चर्चेबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देईल आणि या दरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात मिस्री बांगलादेशचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मोहम्मद तौहीद हुसेन यांचीही भेट घेणार आहेत. बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख प्रोफेसर मोहम्मद युनूस यांचीही ते शिष्टाचार भेट घेणार आहेत. हिंदूंवरील हल्ल्यांबाबत भारताची चिंता ते ढाक्यासमोर मांडतील, अशी अपेक्षा आहे.

Rashtra Sanchar: