सोलापूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये केंद्रिय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे. तसंच ईडीनं संजय राऊत यांच्या मालमत्तेवर टाच आणल्यानंतर राऊतांनी देखील किरीट सोमय्या यांच्यावर सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
वेगवेगळ्या नेत्यांच्या मालमत्ता जप्त करायच्या घरदार उद्ध्वस्त करायचं. आपण स्वातंत्र्य कशासाठी मिळवलं? इंग्रजांच्या काळात तरी काही प्रमाणात न्याय होत होता. आता तर काहीच कळत नाहीये. न्यायालयात जाऊन १०० कोटींचे, ५० कोटींचे आरोप होतात. हे काय आरोप आहेत?” असं भुजबळ म्हणाले आहेत.
पुढे छगन भुजबळ म्हणाले की, “माझं त्यांना आव्हान आहे, राजकारणात राजकीय मैदानात जनतेच्या कोर्टात लढा. उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे शिखंडीसारखे लढू नका. स्वत: लढायचं नाही आणि लढायला पुढे ईडी, सीबीआय वगैरे आणायचे. हे बाजूला सारा आणि जनतेच्या कोर्टात लढा. आम्ही चुकलो, तर आम्ही घरी बसू. कित्येकदा आमचं सरकार गेलं. शरद पवारांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा सत्तेत आलो. जाऊयात जनतेच्या कोर्टात. या देशात जनता श्रेष्ठ आहे”.
“वक्त दिखाई नहीं देता, वक्त बहोत कुछ दिखा देता है. अपनापन तो हरकोई दिखाता है, पर अपना कौन है, ये वक्त आनेपर पता चलता है. एकमेकांच्या दु:खात सहभागी व्हा. मदत करा. प्रेमाने वागा. ही जी दादागिरी सुरू आहे.. वक्त है..बदल जाएगा. आज तुम्हारा है, कल मेरा आएगा. शरीफ है हम, किसीसे लडते नहीं…मगर जमाना जानता है, के किसीके बाप को डरते नहीं”, अशा खोचक शब्दांत भुजबळांनी भाजपाला सुनावलं आहे.