…ही तर जुनीच स्टंटबाजी; शितल म्हात्रे प्रकरणावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

मुंबई : (Sushama Andhare On Sheetal Mhatre) शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी स्वतः शितल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी थेट ठाकरे गटावर आरोप केले. या आरोपांना आणि एकूणच प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भूमिका स्पष्ट केली.

‘मातोश्री’वर बसून आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी हे व्हीडिओ व्हायरल केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्याला उत्तर देतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, एखाद्या महिलेचे असे व्हीडिओ व्हायरल करणं चूकच आहे. परंतु त्याला एखादा माणूस जबाबदार असू शकतो थेट पक्ष-संघटनेवर आरोप करणं चुकीचं असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.

अंधारे पुढे म्हणाल्या की, ठाकरे गटावर आरोप करणं म्हणजे कफल्लक बुद्धीमत्तेच्या लोकांचं लक्षण आहे. ठाकरेंना लक्ष्य करणं, आमच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करणं ही जुनी स्टंटबाजी असून ती सोडून दिली पाहिजे. अब्दुल सत्तार यांनी महिलांबद्दल गलिच्छ भाषा वापरली, गुलाब पाटील, राहुल शेवाळे जे बोलले त्यांना एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

उठायचं आणि कुणाचंही नाव घ्यायचं हे चूक आणि अपरिपक्व बुद्धीमत्तेचं लक्षण आहे. नरेश म्हस्के यांना संजयदृष्टी लाभली असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी चोरी, तस्करी, स्मगलिंग थांबवण्यासाठी ही बुद्धी वापरावी, कफल्लक बुद्धीचे लोक कसे काय निपजतात, असं म्हणत त्यांनी म्हस्केंना टोला लगावला.

Prakash Harale: