‘बीसीजी’ लसीकरण मोहीम; १५ लाख प्रौढांनी घेतला लाभ

‘बीसीजी’ लसीकरण मोहीम

क्षयरोगाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रौढांनाही नवजात अर्भकाप्रमाणेच ‘ बीसीजी’ लस देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने घेतला आहे, त्यासाठी प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून तब्बल सोळा जिल्ह्यांमध्ये लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणात या लसीकरणासाठी ७९ लाख नागरिक पात्र आढळले आहेत, या लसीकरणाला ३७ लाख नागरिकांनी परवानगी दिली आहे. त्यापैकी १५ लाख प्रौढांनी प्रत्यक्षात ही लस घेतली आहे, त्यामुळे ही बाब निश्चितच दिलासादायक समजली जात आहे.

क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा अभ्यास म्हणून १६ जिल्ह्यांत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ज्यांचे लसीकरण झाले, त्यांची पोर्टलवर नोंदही करण्यात येत आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर सर्व माहिती संकलित करून केंद्र सरकारला पाठवली जाणार आहे. त्यानंतर, सरकारतर्फे धोरण तयार करून लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश करायचा की नाही, याबाबत विचार केला जाईल. क्षयरोग प्रतिबंधक करण्‍यासाठी ‘बीसीजी’ लस उपयुक्‍त ठरते की नाही, यासाठी राज्‍यातील १६ जिल्ह्यांत लसीकरण चाचणी घेण्‍यात येत आहे.

क्षयरोग प्रतिबंधासाठी ‘बीसीजी’ लस ही बाळाचा जन्‍म झाल्‍यावर दिली जाते, तसेच ती प्रौढांमध्येही उपयुक्त ठरते का, हे पाहण्यासाठी याआधी झालेल्‍या चाचणीत ही लस क्षयरोगांसह इतर आजारांविरोधातही परिणामकारक ठरल्याचे संशोधनातून सिद्ध झाले. त्यानुसार राज्यातील पात्र नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम आरोग्य विभागाने आखली आहे.

दरम्‍यान, अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेले, संमती न दिलेले, ‘एचआयव्ही’चा पूर्व इतिहास असलेले, गरोदर आणि स्तन्यदा माता, गेल्या तीन महिन्यांत रक्त चढविलेल्या व्‍यक्‍तींना ही लस दिली जात नाही. याबाबत राज्‍यात आधीच सर्वेक्षण केले होते. त्यात पात्र ठरलेल्या व्यक्तींनाच लस देऊन त्‍याची नोंदणी पोर्टलवर केली आहे, अशी माहिती आरोग्‍य विभागाने दिली.

Rashtra Sanchar: