कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. यासोबतच तपास यंत्रणेने २०२२ मध्ये एनआयएच्या दोन गुन्ह्यांमध्ये अनमोलविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे. मुंबई पोलिसांनी नुकतेच राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारा शूटर अनमोल बिश्नोईच्या संपर्कात असल्याचे उघड केल्यावर एनआयएने ही कारवाई केली आहे.
कोण आहे अनमोल बिश्नोई?
गुजरातच्या साबरमती तुरुंगात जेरबंद असलेला लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई उर्फ भानू अमेरिकेत राहतो. तिथून तो लॉरेन्सच्या सांगण्यावरून गुन्हे करत असतो. पंजाबचा गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणीही अनमोल आरोपी आहे. गेल्या वर्षीही त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो बनावट पासपोर्टवर भारतातून पळून गेला होता. असंही म्हटलं जातं की, अनमोल त्याची लोकेशन्स बदलत राहतो. त्याच्यावर सुमारे २० गुन्हे दाखल आहेत. एवढेच नाही तर त्याने जोधपूर तुरुंगात शिक्षाही भोगली आहे. त्याची ७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुटका झाली.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाशीही अनमोलचे संबंध जोडले जात आहेत
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाशीही अनमोल बिश्नोईचा संबंध जोडला जात आहे. नुकताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींबाबत आणखी एक नवीन दावा केला होता. मुंबई गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की, बाबा सिद्दिकीची हत्या करण्यापूर्वी शूटर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या संपर्कात होता. एवढेच नाही तर या तिन्ही आरोपींनी अनमोलशी स्नॅपचॅटच्या माध्यमातून बोलणे केले होते.
लॉरेन्सच्या गँगमध्ये अनमोलची महत्त्वाची भूमिका
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई त्याची टोळी चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. बेकायदेशीरपणे भारतातून पळून गेल्यानंतर अनमोल परदेशात राहतो आणि खंडणी, हवाला आदी कामे करतो, असे सांगितले जाते. यासोबतच टोळीतील सदस्यांसाठी पैसे आणि खर्चाची व्यवस्था करण्याची जबाबदारीही त्याच्यावर आहे. वृत्तानुसार, लॉरेन्सचे भाऊ अनमोल आणि सचिन टोळीच्या दैनंदिन कारवाया पाहतात, तर गोल्डी ब्रार जागतिक गुन्हेगारी सिंडिकेट चालवतात.