लोकअदालतमध्ये प्रलंबित १५९ दावे निकाली निघाले

तब्बल १६ कोटी ८ लाखांची वसुली

रोहकल येथील ३२ पक्षकारांचा दावा निकाली
-महाराष्ट औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या पाचव्या टप्प्यातील संपादित जमिनीच्या सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा मोबदल्याचा दावा राजगुरूनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांनी लोकअदालतीमध्ये तडजोडीतून निकाली काढला. तब्बल ३२ पक्षकार असलेला दावा निकाली काढल्याने पक्षकारांच्या खेड वकील बार असोशिएशनच्यावतीने सत्कार करण्यात आला.

राजगुरुनगर : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात लोकअदालतीमध्ये प्रलंबित २२३१ पैकी १५९ दावे तडजोडीने मिटवण्यात आले, तर १६ कोटी ८ लाख ५० हजार ३८७ रुपयांची वसुली झाली. दाखलपूर्व ३६२१ पैकी ६०० प्रकरणे मिटवण्यात आली असून, त्यापोटी ५७ लाख ९० हजार १ रुपयांची वसुली झाली. या लोकअदालतमध्ये ३२ पक्षकार असलेला दावा तडजोडीने मिटवण्यात आला.


राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. राजूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. अंबळकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. पाखले, के. एच. पाटील, जी. बी. देशमुख, कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश आर. डी. पतंगे, डी. बी. पतंगे, पी. ए. जगदाळे, एन. एस. कदम, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नवनाथ गावडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. संतोष दाते व अ‍ॅड. ललित नवले, सचिव अ‍ॅड. गोपाळ शिंदे, अ‍ॅड. रेश्मा भोर, लोकल ऑडिटर अ‍ॅड. संदीप दरेकर, बारचे सदस्य अ‍ॅड. अबूबकर पठाण, अ‍ॅड. नीलेश देशमुख, अ‍ॅड. प्रतिभा होले यांच्यासह वकील बारचे सदस्य, तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध बँकांचे अधिकारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पॅनेल सदस्य म्हणून अ‍ॅड. योगेश मोहिते, अ‍ॅड. माया डांगले, अ‍ॅड. कृष्णा भोगाडे, अ‍ॅड. सुवर्णा ढोरे, अ‍ॅड. अपेक्षा धुमाळ, अ‍ॅड. अर्चना राक्षे, अ‍ॅड. आदिनाथ कड, अ‍ॅड. वैभव कान्हुरकर यांनी काम पाहिले. विधी सेवा समितीचे विशाल महाजन, प्रतीक वडगावकर, एस. डी. जोशी यांनी न्यायालयाचे कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. नवनाथ गावडे यांनी केले. सूत्रसंचालन खेड बार असोसिएशनच्या सदस्या अ‍ॅड. रश्मी वाघुले यांनी केले, तर अ‍ॅड. गोपाळ शिंदे यांनी आभार मानले.


या लोकअदालतमध्ये रोहकल येथील शेतकर्‍यांचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या पाचव्या टप्प्यातील संपादित जमिनीचा दावा होता. या दाव्यातील प्रमुख शेतकरी कै. केशव रिठे व त्यांच्या वारसांमध्ये भूसंपादनातून मिळणार्‍या पैशाबाबत तडजोड न झाल्याने प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकार्‍यांकडे जमिनीच्या मोबदल्याबाबत हरकती आल्याने त्यांनी हा दावा राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात वर्ग केला होता. या दाव्यात मृत केशव यांची तीन मुले, तीन मुली व त्यांच्यातील मयत व्यक्तीचे वारसदार असे ३२ जण असलेला दावा होता. रोहकल येथील शेतजमिनी एमआयडीसीच्या पाचव्या टप्प्यासाठी संपादित झाल्या. त्याच्या मोबदल्यासाठी कसबे श्रीपती मराठे, यशोदा बबन शिवेकर, मुक्ताबाई गंगाराम मोरे, जनाबाई उर्फ लक्ष्मी बाळासाहेब भांगीरे, मंगल काळुराम हुलावळे, वीज गंगाराम मोरे, खंडू श्रीपती मराठे यांनी दावा दाखल केला होता. या टप्प्याचे तब्बल ६ कोटी ५६ लाख ६ हजार ७५० रुपये वादात रखडले होते.


पक्षकारांच्या वतीने अ‍ॅड. सचिन तांबे, अ‍ॅड. अतुल गोरडे, अ‍ॅड. योगेश मोहिते, अ‍ॅड. पवन कड हे न्यायालयात काम पाहत होते. पक्षकारांमध्ये एकमत झाल्याने हा वाद मिटवण्यात वकिलांना यश आले होते. त्यांनी शनिवारी झालेल्या लोकदलातमध्ये हा दावा तडजोडीने मिटवण्यासाठी न्यायाधीश राजूरकर यांच्या पुढे ठेवला होता. हा खटला तडजोडीने मिटवण्यासाठी पॅनल सदस्य अ‍ॅड. योगेश मोहिते, अ‍ॅड. माया डांगले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, सर्व पक्षकारांचे खेड वकील बार असोसिएशनच्या वतीने न्यायाधीश राजूरकर व खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नवनाथ गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Sumitra nalawade: