मुंबई | Sanjay Shirsat – राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 40 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवारांनी सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत आलेल्या इतर आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अशातच आता महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचं म्हटलं जातंय.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सूचक वक्तव्य केलं आहे. राज्यात आणखी एक गट सत्तेत येईल. तसंच काँग्रेसचे 16 ते 17 आमदार संपर्कात असल्याचं विधान संजय शिरसाट यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
“काँग्रेस पक्ष हा फुटणार आहे, हे नक्की आहे. तो कधी फुटणार आणि कधी सत्तेत येणार, यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. तसंच लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे. त्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिपदं दिली जातील हे देखील तेवढंच खरं आहे”, असंही संजय शिरसाट यांनी सांगितलं.