महागाई – जीएसटी विरोधातील घोषणाबाजीमुळे विरोधी पक्षातले २३ खासदार निलंबित

नवी दिल्ली -Monsoon Session of Parliament 2022 : १८ जुलै पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झालेले आहे. मात्र, सभागृहातील गोंधळामुळे अजूनपर्यंत एकही दिवस व्यवस्थित चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. सोमवारी (२५ जुलै) विरोधी पक्षातील नेत्यांनी सभागृहात महागाई विरोधात घोषणाबाजी आणि पोस्टरबाजी केल्यामुळे लोकसभेतील काँग्रेसच्या चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यांनतर आज पुन्हा एकदा राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या १९ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. घोषणाबाजी आणि कामकाजात सतत अडथळा आणल्याचे कारण देत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विरोधी पक्षांतील खासदार महागाई, जीएसटी या मुद्द्यांवरून चर्चा करण्याची मागणी करत होते. त्यासाठी ते सभापतींसमोर जाऊन घोषणाबाजी करत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अध्यक्षांकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे ७, द्रमुकचे ६, तेलंगण राष्ट्र समितीचे ३, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २, तर भारतीय कम्युनिस्टच्या १ खासदारांचा समावेश आहे.

अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधकांकडून महागाई, जीएसटी, अग्निपथ योजना, इंधन दरवाढ यावर चर्चा करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, केंद्र सरकार मागणी मान्य करत नसल्यामुळे विरोधकांकडून सभागृहात घोषणाबाजी आणि पोस्टरबाजी करून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अनेकवेळा सभागृहाचे कामकाज सतत तहकूब करण्यात येत आहे.

मंगळवारी निलंबित झालेल्या १९ खासदारांमध्ये शांता छेत्री, डोला सेन, सुष्मिता देव, मौसम नूर, शंतनू सेन, अधीररंजन बिश्वास आणि नदिमूल हक (तृणमूल काँग्रेस), आर गीररंजन, एन. आर. एलांगो, महम्मद अब्दुल्ला, एस. कल्याण सुंदरम, एम. शण्मुगम, के. सोमू (द्रमुक), रवी वड्डीराजू, बी. लिंगय्या यादव, दामोदर दिवाकोंडा (टीआरएस), ए. ए. रहीम, व्ही. शिवदासन (माकप), पी. संतोष कुमार (भाकप) यांचा समावेश आहे. त्यांना आठवडाभरासाठी अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे.

Dnyaneshwar: