पुणे : बुद्धिबळ हा असा खेळ आहे जो कोणीही, कुठेही, कधीही खेळू शकतो. त्याला वेळेच्या, ठिकाण किंवा अन्य कोणत्याही मर्यादा नाहीत. विश्वनाथन आनंद, अभिजित कुंटे यांसारख्या जागतिक स्तरावरील खेळाडूंनी भारतात बुद्धिबळ खेळाला वलय प्राप्त करून दिले आहे. अलीकडील काळात बुद्धिबळ खेळाबाबत नागरिकांची पसंती वाढत आहे. पुण्यातही बुद्धिबळ खेळाच्या विविध स्पर्धा होतात.
त्यामुळे लवकरच क्रिकेटप्रमाणेच बुद्धिबळदेखील भारताची क्रीडासंस्कृती बनेल आणि एमसीए हे नाव घेताच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नव्हे, तर महाराष्ट्र चेस असोसिएशन हे नाव डोळ्यासमोर येईल, अशी अपेक्षा पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.
४४ वी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा यंदा जुलै महिन्यात भारतातील चेन्नई या शहरात होणार आहे. त्यानिमित्ताने स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे या चेस ऑलिम्पियाडची ज्योत सध्या भारतातील काही महत्त्वपूर्ण शहरांतून नेली जात आहे. या ज्योतीचे पुण्यात आगमन झाले.
भारताचे दोन संघ सहभागी
चेस ऑलिम्पियाडमध्ये यावर्षी भारताचे दोन संघ सहभागी होणार आहेत. यात महाराष्ट्राचे चार खेळाडू, तीन प्रशिक्षक यांचा समावेश असून, भारताचा सी संघ सहभागी झाल्यास आणखी दोन खेळाडू वाढण्याची शक्यता आहे. यंदा दिव्या देशमुख आणि रौनक साधवानी हे पहिल्यांदाच ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू चांगली कामगिरी करतील, याबाबत मला खात्री आहे. तसेच भारतीय स्पर्धकांची तयारी पाहता यंदा भारतीय बुद्धिबळपटू चेस ऑलिम्पियाडमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी आशा आहे.
हडपसर येथील अमनोरा टाऊनशिप येथे या ज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभास अमिताभ गुप्ता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वुमन ग्रँडमास्टर इशा करवडे यांनी ही ज्योत पुण्यात आणली. या स्वागत समारंभासाठी मेजर ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कारप्राप्त रायफल शूटर अंजली भागवत, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, उपाध्यक्ष गिरीश चितळे, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, क्रीडा संचालक नवनाथ फडतरे उपस्थित होते.
पहिल्यांदाच ऑलिंपिक स्तरावरील खेळाची ज्योत भारतात आणि तेही पुण्यात आली आहे. हा आपल्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. त्याचबरोबर चेस ऑलिम्पियाडची ज्योत आता कायमस्वरूपी नेली जाणार असून, त्याची सुरुवात भारतातूनच होणार आहे. ही भारतासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट असणार आहे.
— सिद्धार्थ मयूर
याप्रसंगी पुण्यातील जय मल्हार कला मंचतर्फे महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात गुप्ता यांनी ऑलिम्पियाड ज्योत ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्याकडे सुपूर्द केली.