महापालिकेच्या उद्यानांची देखभाल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चार उद्यानांच्या देखभाल आणि संरक्षणाच्या कामकाजासाठी दोन वर्षे कालावधीकरिता खासगी संस्थांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी ४ कोटी ८७ लाख रुपये खर्च होणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची १८८ उद्याने आहेत. त्यापैकी काही उद्यानांची देखभाल महापालिका करते, तर काही उद्यानांच्या देखभालीसाठी खासगी संस्थांची नेमणूक केली आहे. यापैकी अनेक खासगी संस्थांच्या निविदांची मुदत संपली आहे. त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. वाकड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाची देखभाल आणि संरक्षणाच्या कामकाजासाठी दोन वर्षे कालावधीकरिता इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यामध्ये प्रेरणा क्रिएटर्स यांनी ७६ लाख ४४ हजार रुपये असा लघुत्तम दर सादर केला. हा दर निविदा अंदाजपत्रकीय दर ९५ लाख ५५ हजार रुपयांपेक्षा २० टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे तो स्वीकृत करण्यात आला आहे.
निगडी येथील दुर्गादेवी उद्यानाच्या देखभाल-संरक्षणासाठी निविदा प्रक्रियेत १ कोटी ५० लाख रुपये दर अपेक्षित धरण्यात आला होता. त्यानुसार तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी निविदा दरापेक्षा ३० टक्के कमी म्हणजेच १ कोटी ५ लाख रुपये हा लघुत्तम दर सादर केला. त्यानुसार त्यांना दोन वर्षे कालावधीसाठी हे कामकाज देण्यात येणार आहे.
भोसरी सहल केंद्र आणि अंकुशराव लांडगे नाट्यगृहातील उद्यान देखभाल व संरक्षणाच्या कामासाठी तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी १ कोटी ७९ लाख ४५ हजार रुपये असा लघुत्तम दर सादर केला. हा दर निविदा अंदाजपत्रकीय दर १ कोटी ८५ लाख रुपयांपेक्षा तीन टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे तो स्वीकृत करण्यात आला.
निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाच्या (गणेश तलाव) देखभाल आणि संरक्षणाचे कामकाज करण्यात येणार आहे. या कामासाठी अजित स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यांनी १ कोटी २५ लाख ५७ हजार रुपये असा लघुत्तम दर सादर केला. हा दर निविदा अंदाजपत्रकीय दर १ कोटी ६४ लाख ७२ हजार रुपयांपेक्षा २३.७७ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे तो स्वीकृत करण्यात आला आहे. या चार उद्यानांच्या देखभाल व संरक्षण कामकाजासाठी एकूण ४ कोटी ८७ लाख १४ हजार ३७२ रुपये खर्च होणार आहे.