पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळीजवळ आरटीओ विभागाने शनिवारी (दि ९) रात्री एक संशयास्पद टेम्पो पकडला होता. या टेम्पोमध्ये तब्बल ६.५ टन (६५०० किलो) इतकी प्युअर चांदीच्या विटा आढळून आल्या आहेत. ऐन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
“ही चांदी काही बँकांची असून, भायखळा वरून मुलुंडच्या गोदामाला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना ब्रिक्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. या चांदीची मोजदाद करून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या टेम्पोला सील केले आहे”. तब्बल ६४ कोटी इतक्या किमतीच्या ‘या’ चांदीबाबत आता पुढील तपास आयकर विभाग करीत आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव विक्रोळी पोलीस ठाण्यात हा चांदीने भरलेला टेम्पो उभा असून त्याला पोलिसांचा खडा पहारा देण्यात आला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त कडक केला आहे, या आधीही, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर टोल प्लाझाजवळ झालेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी बेहिशेबी रोकड जप्त केली होती. या कारमधील प्रवाशांना अटक करण्यात आली होती आणि त्यांची चौकशी करण्यात आली.