इंदापूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व दिवाणी व फौजदारी न्यायालय इंदापूर यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये शेकडो नागरिकांना आपली न्यायालयीन प्रकरणे निकाली काढून घेतले. तसेच अनेक वर्षे विभक्त राहणारी विवाहित जोडपी, बँकांची अनेक वर्षे थकीत असणारी कर्ज व गहाण खत प्रकरणे, वीजबिलासंदर्भातील वादविवाद, वाहतूक पोलिस यांच्याकडून करण्यात आलेल्या कार्यवाही, कौटुंबिक व भावभावकीमधील शेतीसंदर्भातील असणार्या वाटपासंदर्भात असणारी हजारो न्यायालयीन प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात आली.
इंदापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार (दि. ७ मे २०२२) सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत तब्बल ६६ दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच, दाखल पूर्व प्रकरणे (प्री-लिटिगेशन) ची ६१७७ प्रकरणे मिटवण्यात आली असल्याची माहिती न्यायाधीश तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. ल. पाटील यांनी दिली. तसेच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कलाल, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्वानंदी वडगावकर उपस्थित होत्या. यावेळी नागरिकांना निगोशिएबल इन्स्टुमेंट्स अॅक्ट कलम १३८ च्या खाली दाखल झालेली प्रकरणे, बँकवसुली प्रकरणे, वीज व पाणी देयकाबाबतची प्रकरणे, इतर तडजोडीबाबत फौजदारी व वैवाहिक प्रकरणे, भूसंपादनाबाबतची प्रकरणे, नोकरीबाबतचे पगार, इतर भत्ते व निवृत्तीबाबतची प्रकरणे, महसूलबाबतची प्रकरणे, तसेच इतर दिवाणी प्रकरणे यांचे तडजोडीअंती निकाली काढण्यात आले.
तसेच नवरा बायको, सासू-सासरे यांच्या कौटुंबिक वादविवादाची अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. यावेळी इंदापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. मनोहर चौधरी, सचिव अॅड. आशुतोष भोसले, उपाध्यक्ष सुभाष अॅड. भोंग, उपाध्यक्ष अॅड. जमीर मुलाणी, खजिनदार अॅड. राजेंद्र ठवरे, महिला प्रतिनिधी अॅड. प्रिया शिंदे-मखरे, सदस्य अॅड. रुद्राक्ष मेनसे व इंदापूर बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.