नवी दिल्ली – BJP Chief Ministers Meeting : आज (रविवार, २४ जुलै) दिल्ली मध्ये भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांची दिल्लीमध्ये मोठी बैठक पार पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित होते. ‘भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री परिषद’ असे या बैठकीचे नाव होते. भाजपच्या या मुख्यमंत्री परिषदेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता.
भाजपाशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यासोबतच भाजपचे अनेक दिग्गज नेते देखील या बैठकीला उपस्थित होते. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केशव मौर्य, ब्रिजेश पाठक, जयराम ठाकूर, बीरेन सिंह यांचा समावेश होता. या बैठकीत २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
या भाजप मुख्यमंत्री परिषदेत राज्यांतील विकासकामांबाबत आढावा घालण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपले विचार मांडले. त्याचबरोबर या बैठकीत मागासवर्गातील कार्यकर्त्यांना पक्षामध्ये वाव मिळावा यासाठी देखील धोरणे ठरवण्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.