मुंबई | Cyber Fraud – आजकाल सायबर गुन्हेगारीच्या (Cyber Fraud) अनेक घटना घडताना दिसत आहेत. आत्तापर्यंत अनेक लोकांना ऑनलाईन व्यवहार करताना लाखोंचा गंडा घातल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर आताही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या (Mumbai) अंधेरी भागातील एका 72 वर्षीय व्यापाराला लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. ऑनलाईन मिठाई मागवत असताना या व्यापाऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं आहे.
या व्यापाऱ्याची यूपीआयच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली आहे. याबाबतचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. तर या प्रकरणी आशिवाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर सध्या पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्यापारी त्यांच्या पत्नीसह ओशिवारा भागात राहतात. तर रविवारी गणपतीला नैवेद्य म्हणून त्यांना मिठाई हवी होती. त्यामुळे त्यांनी शनिवारी जुहूच्या तिवारी मिठाईवाल्याचा नंबर सर्च केला आणि त्यांना गुगलवर एक नंबर मिळाला. त्यानंतर त्यांनी त्या नंबरवर मिठाईची ऑर्डर दिली.
या व्यापाऱ्यानं ऑर्डर देताना दोन वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून त्या नंबरवर 3,775 रूपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर त्यांना ऑर्डर प्लेस झाल्याचा मेसेज आला. पण त्यांना रविवारी मिठाई मिळालीच नाही. त्यामुळे त्यांनी त्या नंबरवर कॉल करून तक्रार केली. त्यानंतर त्यांना एका व्यक्तीनं सांगितलं की सिस्टीमनं तुमची ऑर्डर कन्फर्म केलेली नाहीये. त्यामुळे आता तुम्हाला पुन्हा एकदा ऑर्डर प्लेस करावी लागेल. यासाठी त्या व्यक्तीनं व्यापाऱ्याला दुसरा एक बँक अकाऊंट नंबर दिला. त्यानंतर व्यापाऱ्याला फोनवरील व्यक्तीनं गुगल पे उघडण्यास सांगितलं. त्यावेळी 29,875 हा कोड सांगत तो गुगल पेमध्ये टाकून सेंट बटण दाबण्यास सांगितलं. त्यानंतर व्यापाऱ्याच्या अकाऊंटमधून पैसे डेबिट झाले. त्यामुळे व्यापाऱ्यानं तक्रार केली. मग फोनवरील व्यक्तीनं रिफंड प्रोसेस सुरू असल्याचं सांगितलं.
पुढे या व्यापाऱ्याच्या यूपीआय अकाऊंटला प्रॉब्लेम असल्याचं सांगत एखाद्या मित्राची मदत घेण्याच्या सल्ला त्या व्यक्तीनं व्यापाऱ्याला दिला. त्यानंतर व्यापाऱ्यानं त्यांच्या एका मित्राला सांगितलं आणि त्यांच्या मित्रानं फोनवरील व्यक्तीस 45,000 पाठवले. तरीही रिफंड मिळाला नाही. मग फोनवरील व्यक्तीनं व्यापाऱ्याच्या मित्राला 50 रूपये पाठवले. तर पैसे पाठवत रिफंड सिस्टिम चालू झाल्याचं सांगत पुन्हा तेवढीच रक्कम पाठवण्यास त्या व्यक्तीनं सांगितलं. त्यानंतर व्यापाऱ्याच्या मित्राला संशय आल्यामुळे त्यांनी जुहूमधील तिवारी मिठाईवाला यांच्या शॉपमध्ये जाऊन चौकशी केली. तेव्हा त्यांना समजलं की तिवार मिठाईवाला ऑनलाईन डिलिव्हरी देत नाहीत. त्यानंतर या दोन मित्रांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.