वाशीम | Pune News – समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. समृद्धी मार्गावरील अपघाताचं (Accident) सत्र काही केल्या कमी होत नाही. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अपघातांची मालिका सुरुच आहे, त्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. प्रशासनाने अनेक उपाययोजना करुनही आपघात थांबत नाही. मंगळवारी संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर तत्परतेने बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 196 जवळ हा अपघात घडला.
समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणारे हे प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत. दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे हा अपघात झाला.