छत्रपती संभाजीनगर | औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचं धाराशिव (Dharashiv) असं नामांतर करण्यात आलं आहे. या नामांतराचा निर्णय झाल्यानंतर त्याविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे. काल (9 मार्च) इम्तियाज जलील यांनी शहरात कँडल मार्च काढला होता. मात्र, पोलिसांनी या कँडल मार्चला परवानगी नाकारली होती. तरीही जलील यांनी कँडल मार्च काढल्यानं त्यांच्यावर शहरातील सिटी चौक पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या नामांतर विरोधी संघर्ष समितीतर्फे इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. तसंच काल औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक मोहम्मद अय्युब जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेटपर्यंत कँडल मार्च करीता पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, या मार्चची परवानगी सिटीचौक पोलिसांनी नाकारली होती. असा मार्च काढू नये अशी नोटीस देखील पोलिसांकडून त्यांना देण्यात आली होती.
मात्र, तरीही इम्तीयाज जलील यांच्यासह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन कँडल मार्च काढला. त्यामुळे या प्रकरणी आता जलील यांच्यासह 1500 अनोळखी लोकांवर जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता जलील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.