आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव
पुणे : इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्टस अँड रीसर्चतर्फे (आयपार) १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ‘आयपार’ आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात भारतासह बुर्किना फासो, जर्मनी, इटली, मंगोलिया आदी देशांतील वैविध्यपूर्ण नाट्य प्रयोगांची मेजवानी नाट्यप्रेमींना मिळणार असून, महोत्सवात विविध कार्यशाळा, नाट्यवाचन सत्रे, चर्चासत्रेही होतील.
मान्यवरांचे लाभणार मार्गदर्शन महोत्सवात नाटक या माध्यमाच्या अनुषंगाने विविध सत्रे, कार्यशाळांमध्ये मान्यवर रंगकर्मी मार्गदर्शन करणार आहेत. त्यात ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रा. रामगोपाल बजाज, श्रीरंग गोडबोले, विभावरी देशपांडे, शुभेन्दू भंडारी, जर्मनीतील लुट्स हुब्नर, योलांडा मोरालेस हर्नांदेझ, इंडोनेशियातील मुंखचिमेग म्यागमरजाव्ह, डॉ. समीर दुबळे, बुर्किना फासो येथील हमाडू मांडे, नोंगोदो वॉड्रॉगो, यासिन्थे काब्रे, इटलीतील निकोला पीएन्झोला, आना डोरा डोर्नो आदींचा सहभाग आहे.
यंदा या महोत्सवाचे सातवे वर्ष आहे. महोत्सवातील नाट्यप्रयोग ‘द पुणे स्टुडिओ’ आणि ‘द बेस’ येथे होतील. १ नोव्हेंबरला ‘ब्रोकन इमेजेस’ या मंगोलियन नाटकाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. २ नोव्हेंबरला बुर्किना फासो येथील ‘द ऑटोप्सी’ हे नाटक, पाँडिचेरी येथील आदिशक्ती संस्थेचे ‘भूमी’ हे नाटक, ४ नोव्हेंबरला कोलकात्याच्या आमटा परिसरच संस्थेचे ‘सावित्री’ हे नाटक, जर्मनीतील ‘२६६६’ हे नाटक, ६ नोव्हेंबरला इटलीतील ‘मेड इन इल्व्हा’ अशी नाटके सादर होतील.
तसेच या महोत्सवादरम्यान कुमार जोशी स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यवाचन स्पर्धेमधील निवडक संघांचे नाट्यवाचनही होईल, अशी माहिती आयपारचे संचालक प्रसाद वनारसे यांनी ही माहिती दिली. महोत्सवाद्वारे जगभरातील रंगकर्मींना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. भारतातील युवा रंगकर्मींना समकालीन जागतिक रंगभूमीवरील घडामोडींचा अनुभव घेता येतो, अन्य संस्कृतींमधल्या कलावंतांशी संवाद साधण्याची संधी मिळते, असे वनारसे यांनी सांगितले.