मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत देशातील सर्व नागरीकांना आपल्या सोशल मिडियाच्या डीपीवर तिरंगा ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या डीपीवर तिरंगा ठेवला आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वतः देखील आपल्या डीपीला तिरंगा ठेवला आहे.
पंतप्रधानांच्या डीपीला तिरंगा ठेवण्याच्या आवाहनानंतर विरोधी पक्षांनी देखील आपल्या डीपीवर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हातात घेतलेला तिरंगा ठेवला आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी डीपीला तिरंगा ठेवला आहे मात्र RSS कडून डीपी बदलण्यात आला नसल्यानं भाजपवर टीका सुरु आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील या विषयाला धरून टीका केली होती. ‘५२ वर्षांत ज्यांच्या मातृसंस्थेने त्यांच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही ते लोक आता तिरंग्याबद्दल बोलत आहेत.’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. मात्र, त्यांच्या या टीकेला भाजप नेत्याकडून सडेतोड प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
“राहुल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांनी RSS वर केलेल्या वक्तव्याला जास्त गंभीर घेण्याची आवश्यकता नाही. संघ आणि संघाच्या विचारसरणीला पूर्ण देशाने स्विकारले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा पोकळ दावा करणाऱ्या कॉंग्रेसची सध्याची स्थिती सर्वांना माहिती आहे.” अशा शब्दांत प्रतिउत्तर भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी राहुल गांधी यांच्या टीकेनंतर दिले आहे.