Manoj Jarange | गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण करत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. त्यामुळे अनेक नेतेमंडळी त्यांची भेट घ्यायला स्वत:हून येत आहेत. अशातच आता मनोज जरांगेंचा हा संघर्ष रूपेरी पडद्यावर उगडणार असल्याचं म्हटलं जातंय. याबाबत जरांगेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
मनोज जरांगे यांच्यावर आधारित चित्रपट येणार असल्याचं म्हटलं जातंय. याबाबत माध्यमांनी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, “आयला हा नवाच ताप आला. आधीच मी उत्तर देऊन बेजार झालो आहे. मला काही लोकं भेटायला आली होती, त्यावेळी मला वाटलं ते मला पाठिंबा द्यायला आले आहेत. पण त्यांनी तर चित्रपटाबद्दल बोलायला सुरूवात केली.”
“त्या लोकांनी चित्रपटाबद्दल सांगितलं, ही त्यांची भावना आहे. त्यामुळे आमच्याकडून त्यांना शुभेच्छा. पण ते यासाठी इथपर्यंत येतील असं मला वाटलं नव्हतं. ते मला म्हणाले की, तुम्ही चित्रपटात काम करा. मात्र, मला ते कसं जमेल?”, असंही मनोज जरांगेंनी सांगितलं.