कसं राखावं कलाभान ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चक्क कल्पनाविलास

ऐतिहासिक संदर्भानिशी येणार्‍या कलाकृतींवर नेहमीच अनेकांची वक्रदृष्टी असते. कारण त्यात सामाजिक तेढ निर्माण करणारे विषय गवसण्याची शक्यता अधिक असते. सध्या याच कारणांवरुन सुरू झालेला वाद चर्चेत आहे. मात्र अशा प्रसंगी चित्रपटनिर्माते आणि टीकाकार या दोहोंनीही समजुतीची भूमिका ठेवणं गरजेचं आहे, असं वाटतं. शेवटी चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम आहे, तो ऐतिहासिक दस्तावेज नाही.

इतिहासातल्या व्यक्ती आणि घटनांच्या आधारे निर्माण होणारी कोणतीही कलाकृती एका वेगळ्या नजरेने बघितली जाते. अशा कलाकृतींना इतिहासाचा आधार असला तरी कलाकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलात्मकतेला वाव हे अधिकार मान्य करुनच ऐतिहासिक दस्तावेज न मानता कल्पनाविलासातून जन्माला आलेली कलाकृती म्हणूनच त्याकडे पाहिलं जातं. मात्र, अलिकडच्या काही घटना, त्याचे समाजात उठणारे तरंग आणि त्यावरुन पेटणारं वातावरण बघता हे राजकारण आता टोकाला गेलं आहे की आणखी टोकदार झालं आहे, हा प्रश्‍न पडतो. दुसर्‍याने काही केलं तर तो स्वैराचार आणि तेच आपण केलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य. हा निकष आपण कुठे आणि कसा लावतो हे बघण्याची वेळ आता आली आहे.

सत्तेमध्ये असताना लोकांना लोकशाही शिकवायची, महात्मा गांधींच्या सहिष्णु विचारांचे दाखले द्यायचे, काही वेळा डोळ्यातून पाणी काढून ‘बापू, हम शरमिंदा हैं; तेरे खातिर जिंदा हैं..’ अशा घोषणा द्यायच्या, लोकांना कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने जाण्याच्या सूचना द्यायच्या आणि आपण मात्र यापैकी कोणत्याही मार्गाने न जाता मत मांडण्याचा अवैध आणि बेकायदेशीर मार्ग चोखाळायचा, हा विरोधाभास सामान्य माणसाला बुचकळ्यात टाकून जातो.

एखाद्याने एखादी गोष्ट बघावी की बघू नये, यावर बळजोरी करणारा आजच्या काळात कोणी असू शकतो का, ही जबरदस्ती आजच्या सुशिक्षित समाजाने सहन करावी का असे अनेक प्रश्‍न पडतात. एखाद्या चित्रपटाला असणारा विरोध सनदशीर मार्गानेही नोंदवता येतो. पण ते न करता झुंडशाही केली जाते आणि पैसे देऊन चित्रपट बघण्यास आलेल्या प्रेक्षकांना मारलं जातं तेव्हा त्याला रानटीपणा न म्हणता सभ्य, संस्कारित वर्तन म्हणायचं का, असा प्रश्‍न पडतो.

एकीकडे जातीपातीचे भेद मोडून काढण्याची भाषा करायची तर दुसरीकडे विवक्षित जातीबद्दल तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करत राहायची, किंबहुना विवक्षित जातीतल्या लोकांनी चित्रपट निर्माण केल्यामुळे त्याला विरोध करायचा हा नेमका कोणता विचार आहे? एकूणच लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी हे सगळं सुरू आहे का, असा संशय घेण्यास जागा उरते. अलिकडे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दाखवलेले काही प्रसंग आक्षेपार्ह आहेत, असं ऐकलं आहे. उदाहरणार्थ, शिवाजी महाराजांच्या तोंडी ‘स्वराज्य व्हावे ही माझी इच्छा आहे आणि माझी इच्छा हीच श्रींची इच्छा आहे…’ असं वाक्य असेल तर निश्‍चितच आक्षेपार्ह आहे. खेरीज बाजीप्रभू आणि शिवाजी महाराज यांच्यामधल्या नात्याला एक वादग्रस्त कंगोरा देण्याचा प्रयत्न केल्याचंही ऐकिवात आहे.

अर्थातच हेदेखील चुकीचं आहे. इथे विचार करण्याजोगी बाब म्हणजे अत्याधुनिक साधनं नसताना आणि श्‍वेत-श्याम चित्रपट असताना याच महाराष्ट्रात भालजी पेंढारकर नावाच्या एका माणसाने युगप्रवर्तक शिवरायांवर चित्रपट निर्माण केला. त्याच्या सुरूवातीला एक पाटी यायची; ज्यावर ‘हा कल्पनाविलास नाही’ असं स्पष्ट केलेलं असायचं. या पार्श्वभूमीवर अगदी आजचा कल्पनाविलास लक्षात घेतला आणि हे स्वातंत्र्य मान्य करुनच हे चित्रपट पाहताना यातली पात्र आठ-दहा फूट उंच उडताना दिसत असतील तर आत्ताची पिढी नक्कीच विचारेल की, पूर्वज एवढे पराक्रमी असताना मुघलांनी इतकी वर्षं आपल्यावर राज्य कसं केलं? म्हणजेच वास्तवाच्या नावाखाली किती अवास्तव दाखवत आहात, याचाही विचार होणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांवरील चित्रपट चालतात, ही बाब लक्षात घेऊनच असे चित्रपट काढले जात आहेत, ही यातली मेखही लक्षात घेण्याजोगी आहे. पण हे लोकांच्या मनातल्या श्रद्धांशी खेळणं नाही का? सदर विषयासंबंधीची ही बाजूही लक्षात घेण्याजोगी आहे. पण यामुळे कोणी हाणामारीवर उतरावं असाही अर्थ होत नाही.
(पूर्वार्ध)

दृष्टिकोन – डॉ. सच्चिदानंद शेवडे – ज्येष्ठ अभ्यासक

Dnyaneshwar: