सोलापूर | Solapur News – सोलापुरात (Solapur) एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने (एपीआय) स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मळाळे असे आत्महत्या केलेल्या पोलीसाचे नाव आहे. आनंद मळाळे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र कामाचा ताण असल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मळाळे हे सध्या नांदेड येथे सेवा बजावत होते. मात्र, मागच्या महिन्यात ते आजारी असल्यामुळे रजा घेऊन सोलापुरातील घरी आले होते.
शनिवारी पहाटे 4 च्या सुमारास ते घराबाहेरील अंगणात गेले. यावेळी आपल्या सर्विस रिवाल्वरमधून डोक्यात गोळी झाडून त्यांनी स्वतःचे जीवन संपवले. घटनेच्यावेळी त्यांच्या पत्नी या घरातच होत्या. बाहेर येऊन त्यांनी पहिल्यानंतर आनंद मळाळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. मृत आनंद मळाळे यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे. मळाळे यांच्या मृत्यूची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.