महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या पायामध्ये मुळशीचा बळी दिला गेला म्हणूनच महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती झाली. सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने मुळशीकरांच्या प्रति कृतज्ञ राहून त्यांना मदत करायला हवी.
डॉ. सदानंद मोरे, वारकरी सांप्रदायाचे अभ्यासक
पुणे : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला गती मिळावी यासाठीच मुळशीचा बळी दिला गेला, म्हणूनच महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती झाली. असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. मुळशी सत्याग्रहाचे प्रणेते विनायक भुस्कुटे लिखित ‘मुळशी सत्याग्रह’ या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र दिनानिमित्त डॉ. मोरे यांच्या हस्ते मुळशी धरण परिसरात झाले. यावेळी पर्यावरण अभ्यासक श्रीपाद धर्माधिकारी, लेखिका नंदिनी ओझा, प्रकाशक अनिल पवार, विनायक भुस्कुटेंचे नातू विद्याधर भुस्कुटे व नातसून वृंदा भुस्कुटे, मुळशी सत्याग्रहाचे अभ्यासक बबन मिंडे हे प्रमुख मान्यवर आणि शेकडो मुळशी धरणग्रस्त उपस्थित होते.
ऐतिहासिक मुळशी सत्याग्रह पर्वाला सन २०२१ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या सत्याग्रहाचे स्मरण म्हणून मुळशी सत्याग्रह या नावाने सत्याग्रह प्रणेते विनायक भुस्कुटे यांनी १९४१ साली नाशिक जेलमध्ये असताना लिहिलेले पुस्तक सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पुनर्प्रकाशित झाले. लेखिका नंदिनी ओझा म्हणाल्या, ‘आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मुळशीचा लढा आणि हा परिसर एक तीर्थक्षेत्रच आहे, कारण या लढ्यातून मार्गदर्शन घेत आम्ही नर्मदेचा लढा लढू शकलो.’
देशाच्या विकासासाठी जे प्रकल्प उभारले जातात त्याच्या लाभावर पहिला अधिकार हा विस्थापितांचा असतो, हेच या पुस्तकातून पाहायला मिळते, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक श्रीपाद धर्माधिकारी यांनी केले. मुळशी सत्याग्रहाच्या शताब्दीला सरकार व टाटा कंपनीने मुळशी धरणग्रस्तांना ते राहात असलेले घर त्यांच्या नावावर करून देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांना त्यांचा मूलभूत हक्क द्यावा, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या पुस्तकाचे प्रकाशक अनिल पवार यांनी याप्रसंगी केली.
दिग्विजय जेधे, महेश मालुसरे, राजेश सातपुते, मंदार मते, चेतन कोळी, जिंदा सांडभोर, मारुती गोळे, नीलेश शेंडे, उमेश वैद्य, विवेक देशमुख, सुभाष वाघ, हर्षद राव, हरीश गवई या सह्याद्री प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. याप्रसंगी माजी आमदार शरदराव ढमाले, ज्येष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे, विविध पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी, मान्यवर व मोठ्या संख्येने मुळशी धरणग्रस्त
उपस्थित होते.