आगळी वेगळी मॅरेथॉन; धावले बांधकाम कामगार

महिला गटात लतीफा बिवी प्रथम
या मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात लतीफा बिवी हिने प्रथम, मर्जिना खातून हिने द्वितीय आणि नर्जिना खातून हिने तृतीय क्रमांक मिळविला. तर पुरुष गटात अंगद कुमार यांनी प्रथम क्रमांक, दीपक साहू याने द्वितीय तर सींथू राम यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांना बक्षीस म्हणून पदक, प्रमाणपत्र आणि रो
ख रक्कम देण्यात आली.

पुणे ः आपल्या घरांची निर्मिती करणारे, त्यासाठी राबणारे हात हे कायमच दुर्लक्षित राहतात. त्यांना करमणुकीची फारशी साधने नसतात, किंवा त्यांच्याविषयी फारसा विचार होताना दिसत नाही. मात्र नुकताच या बांधकाम कामगारांसाठी एक विशेष उपक्रम राबविला गेला, तो म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा. सतत कष्ट करणार्‍या बांधकाम मजुरांना विरंगुळा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये बालमजुरीबाबाबत व विविध कल्याणकारी शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने शहरात प्रथमच बांधकाम कामगारांसाठी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५० बांधकाम कामगारांनी सहभाग नोंदविला. यामध्ये १२० पुरूष आणि ३० महिला स्पर्धक सहभागी झाले होते.

जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त ‘द इन्व्हीझिबल वन्स’ या उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धेसाठी ‘मेलजोल’ ही सेवाभावी संस्था, सहायक आयुक्त कामगार कार्यालय, रोहन अभिलाषा या गृहसंकुलातील रहिवासी आणि रोहन बिल्डर्स यांचे सहकार्य लाभले. कामगार कार्यालयाचे सहायक आयुक्त दत्ता दादासो पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत या सहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात झाली. याप्रसंगी महाराष्ट्र कॉर्पोरशनचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त आनंद जोगदंड, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीच्या समन्वयक सपना राठी, सह-समन्वयक मिलिंद तलाठी, पराग पाटील, लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुहास पाटील आणि रोहन बिल्डर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Nilam: