एकात्मता रॅलीमध्ये घडले एकीचे दर्शन

पुणे : स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करू, या देशाच्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष राहू, स्वातंत्र्य  म्हणजे स्वैराचार नव्हे, महिलांचा आदर-सर्वांचा सन्मान हेच खरे स्वातंत्र्य, देश आधी-बाकी सारे नंतर याची जाणीव म्हणजे स्वातंत्र्य अशा घोषणा देत स्वातंत्र्यदिनी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या एकात्मता रॅलीमध्ये  नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वातंत्र्याचा जागर करत एकीचे दर्शन घडविले.  

अनेक वर्षे हे स्वातंत्र्य चिरायू ठेवून भारताला प्रगतिपथावर नेण्याची  जबाबदारी तरुणांवर आहे. तरुणांनी क्रोध, लोभ, धर्म, धर्मातील तेढ याला तिलांजली देऊन राष्ट्रीय एकात्मता जोपासावी.

_आबा बागुल, माजी उपमहापौर

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात  साजरा झाला. यानिमित्त माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या एकात्मता रॅलीमध्ये देशभक्तिपर गीतांवर नृत्याविष्कार, ७५ मीटर तिरंगा ध्वज, तिरंगी झेंडे याने परिसर देशभक्तिमय झाला होता. या एकात्मता रॅलीचे हे १५ वे वर्ष होते.  रॅलीतील बग्गीमध्ये देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेतील  मुले  सर्वांचे लक्ष वेधून घेत  होते. विद्यार्थी, महिलांचा लक्षणीय सहभाग, ज्येष्ठ नागरिकदेखील रॅलीत सहभागी होत होते. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी उपस्थित होते. एकात्मता रॅलीचे संयोजन अमित बागुल, इम्तियाज तांबोळी, संतोष पवार, सूरज सोनवणे, राजेश देवेंद्र, समीर शिंदे यांनी केले.

Dnyaneshwar: