फडणवीसांची दिशाभूल करणारी माहिती! आदित्य ठाकरेंनी केला कागदपत्रांसह फरक स्पष्ट

मुंबई : (Aaditya Thackeray On Devendra Fadnavis) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आकड्यांचा खेळ करुन महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यातून बाहेर गेलेला वेदांता फॉक्सकॉन आणि आधीचा फॉक्सकॉन प्रकल्प वेगळा असल्याचंही ते म्हणाले. राज्यातून आता बाहेर गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरचा असून 2020 साली बाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल संबंधित होता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान आदित्य म्हणाले, आम्ही केलेल्या प्रश्नावर जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते उपमुख्यांनी दिलं आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं आहे. आपल्या राज्यातून 2 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक असलेले आणि जवळपास 3 लाख रोजगार निर्मिती होणारे 5 प्रकल्प बाहेर राज्यात गेले आहेत. हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की, दुसरे मोठे प्रकल्प आणू. परंतु, महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. 

ते म्हणाले आहेत की, ”15 डिसेंबर 2021 केंद्र सरकारने 76 हजार कोटीची सबसिडी जाहीर केली. ज्यात त्यांनी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले पॉलिसी आणली. 5 जानेवारी 2022 रोजी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट वेदांताने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणाला दिले. 11 जानेवारी 2022 महाराष्ट्र सरकारने यावर प्रतिसाद दिला. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टला अप्रूवल दिलं. त्यांचा राज्य सरकराचा आणि केंद्र सरकारचा काय हिस्सा राहणार, याची माहिती देण्यात आली होती. ही सर्व माहिती त्यांनी एमआयडीसीला सांगितली होती. 24 मे रोजी मी आणि देसाई यांनी अनिल अग्रवाल यांची भेट घेऊन महाराष्ट्रात हा प्रकल्प करण्यासाठी जी काही मदत लागेल ती देऊ, तसेच याबाबत चर्चा केली होती, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.     

Prakash Harale: