आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात; म्हणाले, “जेवढं विष तुम्ही…”,

मुंबई : (Aaditya Thackeray On Eknath Shinde) गुरुवारी दि. ५ जानेवारी रोजी अंधेरी पूर्व येथील गुंदवली शाळेतील ज्युनियर-सिनियर केजीच्या वर्गाच्या नूतनीकरणाचं उद्घाटन युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महापालिका, विधानसभेच्या निवडणुका घेण्याची हिंमत यांच्यात नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

दरम्यान पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “नवीन वर्षात तरी या गद्दार सरकारने ४० आमदारांच्या आणि १३ खासदारांच्या जागी निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी. बेकायदेशीर मुख्यमंत्री स्वतःच्या कामासाठी दिल्लीत जातात, गुवाहाटीला जातात, पण राज्यासाठी कधी गेले नाहीत. आपल्याकडे एक सीएम आणि दुसरे सुपर सीएम आहेत,” असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. त्यामुळे येत्या काळात शिवसेना-शिंदे गटातील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटातील १२ जणांवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे यावर प्रतिनिधींनी विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “निवडणुका तर घेऊन दाखवाव्यात. खूप विशेष विशेष होत चाललं आहे. पण, जेवढं विष तुम्ही पेरलं, तसं निवडणुका घ्या,” असं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. आता मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंचे आव्हान स्विकारणार का? हे पाहावं लागणार आहे.

Prakash Harale: