नागपूर | Aaditya Thackeray – आज (22 डिसेंबर) नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. तसंच दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि रिया चक्रवर्तीच्या फोन काॅलमधील AU नावावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. अशातच दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. “एका 32 वर्षाच्या तरुणानं खोके सरकारला हलवून ठेवलं आहे, त्यामुळे बदनामीचे प्रयत्न सुरु आहेत”, असं आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळेच बदनामीचे प्रयत्न होत आहेत. जनतेला माहित आहे की आज हे गद्दार मुख्यमंत्री ज्या घोटाळा प्रकरणात अडकले आहेत, ते आम्हाला सभागृहात सादर करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्ष हे सतत वेलमध्ये येत आहे आणि अध्यक्ष, तालिका अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत. मात्र, त्या बाजूला 14 जणांना बोलू दिलं, तेही एकापाठोपाठ. अडीच वर्षात मी तरी असं हाऊस सुरु असल्याचं पाहिलं नाही. लहानपणापासून मी टीव्हीवर अधिवेशन पाहिलं आहे. पण सत्ताधारी पक्ष वेलमध्ये येऊन आंदोलन करतोय, असं कधीच दिसलं नाही.”
“सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्यपाल हटाओ आम्ही जी सातत्याने मागणी करत आहोत, ज्या महाराष्ट्रद्वेशी राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महात्मा फुलेंचा अपमान केला. त्यांना वाचवण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न केला जातोय. हा प्रयत्न घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे जे काही शोधायचंय ते शोधू द्या. महत्त्वाची गोष्ट एकच आहे की, NIT चा घोटाळा आम्हाला सभागृहात सादर करु न देण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत,” असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
यांच्यात नाव घेण्याची हिम्मत नाहीये. मी काही लोकांकडे लक्ष देत नाही. पण जसं मी सांगितलं की, एका 32 वर्षांच्या तरुणानं एका खोके सरकारला हलवून ठेवलंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.