वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे माजी अधिक्षक अब्दुल जलील शेख यांचा रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश
पुणे : अनेक अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी, वस्तू व सेवा कर विभागाचे माजी अधिक्षक अब्दुल जलील शेख यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केला आहे. तसंच त्यांची अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या आदेशाने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष अॅड. अयुब शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.
जलील हे मुंबई येथे नाकोटीक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणांचा पर्दाफाश करण्यात आघाडीवर होते. त्यांनी महसूल, गुप्तचर संचालनालयमध्येही यशस्वीरित्या काम पाहिले आहे. रत्नागिरी येथे सीमा शुल्क विभागातही ते काही वर्षे कार्यरत होते. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्यास सुरूवात करीत असल्याचं त्यांनी आज जाहीर केलं. त्यांच्या पक्ष प्रवेशानं मुस्लीम समाजाची मोठी ताकद वाढणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, रिपब्लिकन पक्षात विविध विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना आणणार असल्याचं व पक्षाची ताकद वाढवणार असल्याचं शेख यांनी यावेळी सांगितलं. या पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष आयुबभाई शेख , सरचिटणीस खाजाभाई शेख व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.