भिकार भोट

पन्नास खोके आणि सगळेच बोके हे जनतेला समजत नाही असे नाही. त्यामुळे आम्हीच निवडून दिलेल्या या पापाला परमेश्वराने किमान सुबुद्धी द्यावी आणि आम्हाला माफ करावे, असेच म्हणणे सुज्ञ मतदारांच्या हातात राहिले आहे.

राजकारणाच्या घसरलेल्या स्तराबद्दल आता लिहावे असे काहीच राहिलेले नाही. राजकीय नेते ज्या पद्धतीने वागत, बोलत आहेत त्याचा विचार केला, तर साधन सुचिता आणि राजकीय सभ्यता याचा दूर दूर संबंध राहिलेला नाही. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ते तुरुंगात असलेले संजय राऊत यांच्यापर्यंत अनेक मणी या माळेत पाहायला मिळतात. आपण काय बोलतो आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची यत्किंचित कल्पना या मंडळींना का असत नाही हे समजत नाही. लोकशाहीमध्ये निवडून येण्याची क्षमता हा निकष असल्यामुळे अशी भोट मंडळी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाहायला मिळतात. आता भोट या शब्दाचा अर्थ काय असा प्रश्न विचारला, तर या शब्दाचा अर्थ निर्बुद्ध किंवा ज्याला आपण ‘ढ’ म्हणतो असा अमरकोशात दिला आहे. ही मंडळी सामाजिक आशयाच्या दृष्टीने निर्बुद्ध आहेत, हे वारंवार सिद्ध करत असतात. भाषणांमध्ये वाटेल ते बोलायचे आणि त्याला टाळ्या, शिट्या मिळाल्या म्हणजे ती आपली शैली म्हणून मिरवायचे, हा प्रकार लाजिरवाणा आहे.

अर्थात अशा भाषणांना टाळ्या आणि शिट्या वाजवणारेही याला तेवढेच जबाबदार आहेत. ‘ही आमची बोलीभाषा आहे’ असे कौतुक सार्वजनिक पातळीवर करणे तर अधिकच धोकादायक असते. आणि ते अशा प्रकारे वारंवार उघडकीस येत असते. अनेक शिव्या किंवा अपशब्द बोलीभाषा म्हणून सहज वापरले जातात. मात्र माध्यमांपुढे बोलताना, सार्वजनिक पत्रके काढताना किंवा जनसमुदायाला उद्देशून लिहिता-बोलताना याबाबतचे भान नक्कीच ठेवले पाहिजे. खासगी बैठकीत किंवा पारावर ज्या पद्धतीने गप्पा मारतो, तसेच सरसकट बोलत राहणे हा निषेधार्ह प्रकार असून, खरोखरच असे बोलणाऱ्यांना रस्त्यावर फिरून द्यायलाच नको. मात्र अभिरुचीचा प्रकार पाहता आता ही भाषणे, वक्तव्ये श्रोत्यांना आवडू लागली असतील आणि अशीच भाषा पसंत पडत असेल तर सभ्यतेचे पाठ, सुसंस्कृतपणा शिकवायचा कोणाला? ऋतुजा लटके यांच्या विरोधात निवडणुकीत कोणी उभे राहू नये हे सांगत असताना महाराष्ट्राची थोर परंपरा आणि राजकीय संस्कृती याची भाषा राजकीय मंडळींकडून होत होती. दैनंदिन जीवनातही ती प्रतिबिंबित व्हावी एवढीच माफक अपेक्षा आहे. यापुढे जाऊन ज्या कारणामुळे अब्दुल सत्तार चिरडीला आले त्या ५० खोक्यांचा उल्लेख दररोज करणे हाही फारसा शहाणपणा नाही. ५० खोकी घेतलीच असतील आणि हे मंत्रिमंडळ बेकायदा आहे असे आदित्य ठाकरेंना वाटतच असेल, तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वा सनदशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे.

त्यातून आपण खरोखरच किती धुतल्या तांदळासारखे आहोत याचाही विचार केला पाहिजे. आरोप-प्रत्यारोप करतानाही पातळी सोडून ते करणे यातही फारसा शहाणपणा नाही. तीन महिन्यांपूर्वीपर्यंत ज्यांच्या गळ्यात गळे घालत होता ते इतके नालायक आहेत हे माहिती होते तर त्यांना तुमच्या काळात मंत्रिपदे का दिली हेही स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. वाट्टेल ते करणे म्हणजे राजकारण ही व्याख्या आता सर्वच पक्षांना मान्य झाली असल्यामुळे वाट्टेल ते करण्याची सर्वोच्च पातळी गाठण्याची चढाओढच या सगळ्या पक्षांमध्ये लागली आहे. ५० खोके आणि सगळेच बोके हे जनतेला समजत नाही असे नाही. त्यामुळे आम्हीच निवडून दिलेल्या या पापाला परमेश्वराने किमान सुबुद्धी द्यावी आणि आम्हाला माफ करावे असेच म्हणणे सुज्ञ मतदारांच्या हातात राहिले आहे. एकूण भिकार भॊट मंडळींच्या हातात सत्ता गेल्यावर काय काय घडू शकते हे गेल्या अडीच वर्षांपासून पाहायला मिळतच आहे.त्यावरचे अध्याय अनुभवायला यायला नकोत एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

Nilam: