‘एक दिवस बळीराजासाठी’… अधिकाऱ्यांसह कृषीमंत्री शेतात मुक्कामी!

मुंबई : (Abdul Sattar on State Former) राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नवी घोषणा केली आहे. दरम्यान अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. अनेक अडचणी आहेत, कर्ज आणि अन्य समस्या जवळून जाणून घेणे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे या दृष्टीकोनातून राज्यात ‘एक दिवस बळीराजासाठी’ ही मोहीम राबवली जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत कृषी विभागाचे सचिव, अधिकारी सगळेच शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी, प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या अडचणी या जाणून घेण्यासाठी थेट गावातल्या घरामध्ये अधिकारी पोहोचतील. त्यांच्यासोबत राहतील, शेतात जातील, रात्री मुक्काम करतील. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, हे शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस राहतील, असंही सत्तार यांनी स्पष्ट सांगितलं आहे.  

राज्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान यातून त्यांना तातडीने मदत करणे हा या मोहिमेच्या मुख्य उद्देश आहे. राज्यात पुढील 90 दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे. मोहीम संपल्यानंतर सर्व जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी नवीन योजना राबवल्या जाणार, असेही सत्तार यांनी अधिवेशनात स्पष्ट केलं आहे. 

Prakash Harale: