मुंबई | Abdul Sattar On Uddhav Thackeray – शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर काल (2 ऑगस्ट) पुण्यातील कात्रज परिसरात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. हा हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचं शिंदे गटाचं मत आहे. या संदर्भात अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”आमच्या आमदारांवर असे हल्ले होत असतील, तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील”, असं ते म्हणाले.
या हल्ल्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. ही तत्वाची लढाई आहे, ती निश्चित लढावी. पण असा हल्ला करणं चुकीचं आहे. असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असतील तर आम्हालाही त्यांच्यावर असे हल्ले करावे लागतील. एकाकडून मारलं जात असेल तर दुसऱ्याकडून बघायची भूमिका घेतल्या जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
हा हल्ला करणाऱ्या दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी लागेल. तसंच या हल्ल्याच्या मागे कोण आहे, याचा सुद्धा शोध घ्यायला हवा, असं सत्तार म्हणाले. तसंच शिवसेना नेते बबन थोरात यांनी दिसेल तिथे आमदारांच्या गाड्या फोडा, त्यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल, असं वक्तव्य केलं होतं. याबाबत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, ”बबन थोरात यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होईल. कोणी असं वक्तव्य करत असेल आणि उद्धव ठाकरे त्यांचा सत्कार करत असतील, तर उद्धव ठाकरेंचा या सर्व प्रकाराला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.