मुंबई | Vaibhavi Upadhyaya – सिनेसृष्टीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyaya) हिचं निधन झालं आहे. ती 32 वर्षांची होती. वैभवी उपाध्यायचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. तिच्या निधनानं आता संपूर्ण मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (22 मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात झाला. या भीषण अपघातात वैभवीचा जागीच मृत्यू झाला. वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीसोबत फिरायला गेली होती. त्यावेळी एका मोठ्या वळणावर त्यांच्या कारचं नियंत्रण सुटल्यामुळे त्यांची कार थेट दरीत कोसळली आणि हा भीषण अपघात झाला. तसंच आज (24 मे) वैभवीच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वैभवीनं अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘अदालत’, ‘सीआयडी’ या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत. तसंच ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेतील जास्मीन या पात्रानं वैभवीला विशेष ओळख मिळवून दिली होती. त्याचबरोबर तिनं ‘छपाक’, ‘तिमिर’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.