नागपूर : महाराष्ट्राची ‘समृद्धी’ आणि विकासासाठी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) तयार करण्यात आला. समृद्धी महामार्ग घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. समृद्धी मार्गावरील अपघाताचं सत्र काही केल्या कमी होत नाही. यामुळे समृद्धी महामार्गावर सुरु झाल्यापासून अपघातांची मालिका सुरुच आहे, त्यामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. समृद्धी महामार्गावर आठ महिन्यांमध्ये 700 हून अधिक अपघात झाले आहेत. त्यामुळे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे 729 अपघात झाले असून त्यापैकी 47 अपघात जीवघेणे ठरले आहेत. या 47 अपघातात 101 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर 99 अपघातात 262 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. राज्य पोलिसांच्या “महामार्ग सुरक्षा” दलाने समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांचा खास अभ्यास केला असून त्या आधारावर तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
महामार्ग सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल दिलेल्या माहितीप्रमाणे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळेला चालकाला येणारी झोप आणि तीव्र गतीने वाहन चालवणे (over speeding) हेच अपघातांचे प्रमुख कारण आहे समृद्धी महामार्गावर सर्वाधिक बळी चालकाला येणाऱ्या झोपेमुळे गेल्याचे या अहवालात समोर आले आहे. चालकाला आलेल्या झोपेमुळे 12 अपघात घडले असून त्यामध्ये 44 जणांचा बळी गेला आहे. तर, ओव्हर स्पीडिंग म्हणजेच तीव्र गतीने वाहन चालवल्यामुळे 21 अपघात घडले असून त्यात 33 जणांचा बळी गेला आहे. टायर फुटल्यामुळे ही चार अपघात झाले असून त्यात 10 जणांचा बळी गेला आहे.