सात सुरांची साथ नव्यांची

‘आम्हीच विजेते होणार, अन्यथा तुमचा धुरळा नक्‍कीच. आम्ही नाही, तर कुणीच नाही.’

तू जो मेरे सूर मे सूर मिलाके, संग गाले, तो जिंदगी हो जाए सफल… सा रे ग म प ध नी सा… ये म्हणा की गं तुम्हीपण माझ्याबरोबर. सात सुरांची साथ नव्याची ऑडिशनला आपल्याला उद्या जायचयं! आहेना लक्षात? आपल्या सातही जणींची फायनला निवड पक्की होणारच. केशरबाई तू काळी दोनमधे सुरु करशील. पिवळाक्का तुम्ही काळी चार घ्या बरं. उदयाचा विठूचा गजर टिपेला न्या. तुम्ही दोघी, करडू दिदी, यमनचा षड्ज द्रुतलयीत लावाल. मी आणि ग्रे ताई मालकंस नि भैरवी ने मंद्र सप्तकात सांगता करू. परिक्षक कोणीही असले तरी आपण घाबरायचं नाही. घाबरायचं त्यांनी आपल्याला. एक सुरात म्याँव म्याँव करून त्यांना सळो कि पळो करू. पायात घुटमळत राहू. तोंड पुसत पुसत त्यांना आपली निवड करायला भाग पाडू. नाहीतर अंगावर फिस्कारून येऊ म्हणावं, ही धमकी देऊ.

आमच्याशिवाय स्पर्धा होणे नाही! आम्ही नसलो तर स्पर्धा उधळून लावू. इतकंच नाही तर विजेते आमच्यातलेच असतील.
बाहेरचा कुणी दिसलाच तर स्पर्धेत फिक्सिंग झाले असण्याचा संशयाचा धुरळा मीडियात उडवू देऊ, अशी तंबीच त्यांना देउ या; आणि आपले सगळेच नंबर आले तर स्पर्धा खेळीमेळीत निकोप वातावरणात झाली, उद्याच्या नव्या गायकांना प्रोत्साहन, प्रेरणा अशा स्पर्धेतून मिळते, म्हणून अशा स्पर्धा सतत होणं गरजेचे आहे, असं मीडियाला मुलाखत देताना तोंड फुगवून सांगूया.
यातूनच आयोजक, ठेकेदार यांचे उखळ कायम पांढरे होत जाईल. आणि मग टीआरपी वाढला की स्पर्धेचे एपिसोड वाढतील, आपल्याला अधिक काम मिळेल. चॅनेलवाल्यांची चांदी आणि नव्या गायकांची एक्सपोजरची नांदी होईल. तेव्हा उद्या
“… सारे के सारे गा मा के लेकर गाते चले….” कोरस हम साथ साथ मे म्हणू या… “

-नंदकुमार वडेर

Nilam: