“…तर भाजपच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वाॅचमन”, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य!

मुंबई | Sachin Sawant – काल (19 डिसेंबर) नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना एक मोठं विधान केलं. “मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असं बावनकुळे म्हणाले होते. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच यावर विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. यामध्ये काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “राक्षसी सत्ताकांक्षा असलेल्या भाजपच्या पोटातील ओठांवर आलं आहे. आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा सन्मान आहे. पण, खेदानं सांगावंसं वाटतं की भाजप नेत्यांकडून सतत येणारी विधानं पाहिली तर भाजपच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन आहेत. ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था आहे.”

तसंच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनीही चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया दिली होती. “चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा अर्थ सोपा आहे. चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) काही दिवसांपूर्वीच एका सभेत सांगितलं होतं, की देवेंद्र फडणवीस आमचे खरे मुख्यमंत्री आहेत. तसंच आज बावनकुळेंचं वक्तव्य समोर आलं आहे. हे जाऊ द्या काही दिवसांपूर्वी स्वत: एकनाथ शिंदेच (Eknath Shinde) बोलले होते की महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. याचा अर्थ स्पष्ट आहे , एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपला शरण गेला आहे. भाजपच्या मनात जे आहे की देवेंद्र फडणवीसांनीच नेतृत्व करावं, याचा अर्थ ते एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत देत नाहीत. बावनकुळेंच्या वक्तव्याचा गांभीर्यानं विचार शिंदे गटानं आणि महाराष्ट्रानं केला पाहिजे”, असं मिटकरी यांनी म्हटलं होतं.

Sumitra nalawade: