मुंबई | झी मराठी वाहिणीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. या मालिकेत धनश्री काडगावकरने वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. तसंच धनश्री ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. नुकतीच तिने कोल्हापूरकरांसाठी खास पोस्ट लिहीली आहे.
धनश्री काडगावकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत मजा-मस्ती करताना दिसत आहे. तसंच या फोटोत तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील काही कलाकार देखील दिसत आहेत. सोबत तिने या पोस्टला हटके कॅप्शन देखील दिले आहे.
“या होत्या माझ्या कोल्हापूरच्या काही आठवणी…कोल्हापूरच्या या शहराने आजपर्यंत इतकं प्रेम दिलय, इथल्या माणसांनी इतकं प्रेम दिलं आहे…इथं आलं की घरी आल्यासारखंच वाटतं…असंच प्रेम राहु दे…इथुन पुढे सुद्धा तुमच्या प्रेमाची अशीच गरज आहे”, असं कॅप्शन धनश्रीनं दिलं आहे.