मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयानं (Thane Sessions Court) अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) जामीन देण्यास तुर्तास नकार दिला आहे. अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यानं जामीन देता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. तर रबाळे पोलिस स्टेशन अंतर्गत अॅट्रोसिटी प्रकरणी जामिनाबाबत अद्याप पोलिसांचा जवाब येणे बाकी आहे. त्यामुळे केतकीचा जेलमधीला मुक्काम वाढला आहे.
दरम्यान, केतकी चितळे विरोधात वर्ष २०२० मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर (Social Media) अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात (Rabale Police Station) तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.
दरम्यान, शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात केतकी चितळेच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. केतकी चितळेने मोबाईलमधील SMS डिलीट केले असल्याची माहिती समोर आली आहे. पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतकी व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर करत नसून फक्त फेसबुक (Facebook)आणि SMS च्या माध्यमातून सक्रिय असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालं आहे.