मुंबई : Sai Tamhankar on Industry मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. तसंच ती लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सईने फक्त मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिमध्येच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही पदार्पण केलं आहे. आज ती मराठीमधील आघाडीची अभिनेत्री आहे. त्याचबरोबर कोणत्याही विषयावर आपलं स्पष्ट मत मांडणं ही सईची खासियत आहे. सईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
सईने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना कशी वागणूक मिळते? अभिनेत्रींचा मानधनाचा मुद्दा याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. सईने जागरण डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील आताची परिस्थिती काय आहे? याबाबत सांगितलं. मी मराठी चित्रपटसृष्टीमधून आहे. मला इतर चित्रपटसृष्टीबाबत माहित नाही. पण मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना समान वागणूक मिळत नाही. आजही अभिनेत्यांच्या तुलनेमध्ये मराठी अभिनेत्रींना कमी मानधन मिळतं. मी खूप आधी याबाबत बोलले होते. पण त्याचा आजपर्यंत काहीच फायदा झाला नसल्याचं, सई म्हणाली.
एखाद्या भूमिकेसाठी अभिनेत्री देखील तितकीच मेहनत घेते जितकी एखादा अभिनेता मेहनत करत असेल. मी या मुद्द्यावर पुन्हा माझं मत मांडण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरुन निर्माण झालेल्या या परिस्थितीमध्ये काही सुधारणा होईल. खरं तर मराठी चित्रपटसृष्टीमधील सगळ्या अभिनेत्री एकत्र आल्या तर याविरुद्ध लढणं सोपं होईल. त्यातून काहीतरी मार्ग निघेल. पण एकच अभिनेत्री जर बोलत असेल तर त्याचा निर्माते-दिग्दर्शकांवर कोणताच परिणाम होत नाही. कारण इतर अभिनेत्री मिळेल त्या मानधनामध्ये काम करतात, असंही सईने सांगितलं.