पुणेकराची गगन भरारी! ‘आदित्य एल-१’सोबत पुणेकर शास्त्रज्ञाच्या उपकरणाने देखील घेतले उड्डाण..

Aditya-L1 Mission : सौरवादळांच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या उपकरणाची निर्मिती एका मराठी शास्त्रज्ञाच्या नेतृत्वात झाली आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर पुणे) कार्यरत असलेल्या प्रा. भास बापट यांनी आदित्य ‘सोलर विंड पार्टिकल एक्स्पीरीमेंट’ची (एएसपीएएक्स) निर्मिती केली आहे. अहमदाबाद येथील फिजिक्स रिसर्च लॅबरोटरीमध्ये (पीआरएल) असताना त्यांनी ही कल्पना मांडली होती.

शनिवारी आदित्य एल-१च्या यशस्वी उड्डाणानंतर ‘सकाळ’ शी संवाद साधताना प्रा. बापट म्हणाले, ‘‘इस्रोच्या प्रक्षेपकाद्वारे आदित्य एल.-१ चे यशस्वी उड्डाण झाल्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. परंतु, आमचे लक्ष लागले आहे ते तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष येणाऱ्या संदेशाकडे. पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर आदित्य एल-१ पोचल्यानंतर ते कार्यान्वित झाल्यावर खऱ्या अर्थाने आम्ही आनंदोत्सव साजरा करू.’’

२०१३ मध्ये सोलर विंड पार्टिकल एक्सपीरीमेंटची संकल्पना मांडण्यात आली. २०२० मध्ये प्रत्यक्ष अवकाशात पाठविण्यासाठीचे उपकरण विकसित झाले. एकाच यानाद्वारे वेगवेगळ्या दिशांनी येणारे सौरकण आणि प्रारणांची माहिती याद्वारे मिळणार आहे.

Prakash Harale: