“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र…” आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई | Aditya Thackeray On CM Eknath Shinde – शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज (30 नोव्हेंबर) मुंबईत आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर टीका केली.

“एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय. उदय सामंत (Uday Samant) यांना उद्योग मंत्री म्हणून काम करताना मी कधीच पाहिलेलं नाही. राज्य सरकारनं त्यांना या संपूर्ण प्रोसेसमधून बाहेर ठेवलेलं आहे. ज्यांचा या खात्याशी संबंध नाही ते का उत्तर देत आहेत. ज्यांना मी प्रश्न विचारले, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी आव्हान दिलेलं आहे. तुम्ही मंचावर बसा, मीडियासमोर आणि माझ्यासमोर डिबेट करा,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र द्वेष सुरू आहे. एकीकडं या सगळ्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्याच प्रसंगाची तुलना ही शिवाजी महाराजांसोबत केली जाते. यामधून महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यांची तुलना महाराजांसोबत करण्याचा हा प्लॅन आहे आणि त्यामधून अशा पद्धतीची वक्तव्य येतात असं मला वाटतं”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Sumitra nalawade: