“शिवसेनेनं कुठेही…”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

नागपूर | Aditya Thackeray On Devendra Fadnavis – सध्या राज्यात शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवर जोरदार चर्चा सुरू आहे. या युतीनंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. भाजपकडून या युतीबाबत टीका केली जात असून शिवसेनेला याचा फायदा होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी यावर एवढंच म्हणेन की विनाशकाले विपरीत बुद्धी”, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. या टीकेला आता शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात नागपूर विमातळावर माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “शिवसेनेनं कुठेही भूमिका सोडलेली नाही. शिवसेनेची भूमिका कायम स्पष्ट राहिलेली आहे. ज्यांना आमची मतं, भूमिका पटली ते आमच्यासोबत येतील. गेल्या अडीच वर्षांत देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्याच आधारावर एकत्र आलो आणि सोबत राहिलो. ज्यांना आमची भूमिका मान्य असेल ते सोबत येतील”.

दरम्यान, शुक्रवारी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी या युतीचं समर्थन केलं आहे. “आपण सगळे शिवप्रेमी आहोत. महाराष्ट्रावर असलेला हा दुहीचा शाप आपण गाडून टाकू आणि एकत्र येऊन नवीन इतिहास घडवू”, असं म्हणत उद्धव ठाकरेनी संभाजी ब्रिगेडशी झालेल्या युतीचं स्वागत केलं आहे.

Sumitra nalawade: